फक्त दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा एकदा आत्मपरीक्षण करा; निलेश राणेंचा भास्कर जाधवांना सल्ला

ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी रविवारी चिपळूणमध्ये आपल्या कार्यकर्त्यांशी सभेच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी भास्कर जाधव यांनी आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करुन दिली. त्यांच्या या सभेनंतर भाजप नेते नीलेश राणे हे देखील भावुक झाले. त्यांनी व्हिडिओ शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. मलाही तो काळ आठवतो, जेव्हा मी तुमच्या पाया पडायचो, तुम्हाला काका बोलायचो अशा भावना नीलेश राणे यांनी व्यक्त केल्या आहेत.

भास्कर जाधव यांच्या भाषणाबाबत बोलताना निलेश राणे म्हणाले की, भास्कर जाधव यांनी त्यांचे सहकारी त्यांना सोडून का गेले, यासाठी आत्मचिंतन केले पाहिजे. तुम्ही रडण्याचा कार्यक्रम बंद करा आणि कामाला लागा, तुमचे सहकारी तुमच्याकडे परततील की नाही बघा. मलाही तो काळ आठवतो, जेव्हा मी तुमच्या पाया पडायचो, तुम्हाला काका बोलायचो. मी देखील ते दिवस विसरलेलो नाही. तुमच्यासोबत अनेक आठवणी आहेत, त्या आम्ही आजही विसरलेलो नाही. पण तुम्ही असेच वागत राहिलात तर आमच्यासारखी तरुण मुले जी तुमच्याकडे काका म्हणून आदराने पाहत होती, ती तुमच्यापासून लांब गेली. तुम्ही डोंगरावर जाऊन एकटे बसा आणि या सगळ्याचा विचार करा. हा विचार करताना, ‘मी कोण आहे’ ही भावना बाजूला ठेवा, असा सल्ला निलेश राणे यांच्याकडून भास्कर जाधव यांना देण्यात आला आहे.

पुढे बोलताना निलेश राणे म्हणाले तुम्ही आजच्या भाषणात सहकाऱ्यांवर टीका केली. पण हे तुमच्याबद्दलच का होतं, इतर नेत्यांबाबत का होत नाही, याचा कधीतरी विचार करा. निलेश राणे चिपळूणमध्ये राहत नाही, तरी चिपळूणमधील सहकारी माझ्यासोबत सावलीसारखे असतात. आज इतकी वर्षे होऊनही त्यांनी माझी साथ सोडलेली नाही. पण तुम्ही चिपळूणमध्ये राहूनही तुमचे सहकारी तुम्हाला का सोडून गेले? तुम्हाला साथ द्यायला कोणीही तयार नाही. असं का होतंय, याचा विचार करा. फक्त दुसऱ्यांवर टीका करुन चालत नाही. तुम्ही चांगले, बाकी वाईट असे नसते. तुमच्या चुका काय, तुम्ही कितीजणांना वेठीला धरलं, तुम्ही कार्यकर्त्यांसाठी कितीवेळा उभे राहिलात, सहकाऱ्यांना कितीवेळा मदत केली, काय शब्द वापरलेत, या गोष्टींचाही विचार करा. आता तुमचं वय 70 च्या आसपास आहे. आता नाही तर कधी विचार करणार, फक्त दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा एकदा आत्मपरीक्षण करा असा सल्ला निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांना दिला.