उबाठाचे बाळराजे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका

देशातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या मुंबईतील वरळी ते मरिनलाईन्स सागरी सेतू मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे सोमवारी लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. गेल्या काही काळात कोस्टल रोडच्या श्रेयवादावरुन उद्धव ठाकरे आणि भाजपमध्ये सातत्याने वाद रंगला आहे. याचे प्रत्यंतर सोमवारी कोस्टल रोडच्या लोकार्पण कार्यक्रमावेळी देखील आले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोस्टल रोडच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.

या वेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर त्यांचे नाव न घेता टीका केली. “मला काल समाजमाध्यमावर बघायला मिळालं की उबाठाचे बाळराजे सांगत होते की कोस्टल रोड आम्ही केला आणि आमच्या कामाचे श्रेय ते घेत आहेत. पहिल्यांदा तर मी त्यांना सांगतो की, आम्ही दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय घेणारे लोक नाहीत. जे काम आम्ही करतो, त्याचेच श्रेय आम्ही घेतो. या कोस्टल रोडची संकल्पना नवी नव्हती. मला आठवतं उद्धव ठाकरेंनी तर मुंबई महापालिकेच्या दोन निवडणुका या कोस्टल रोडचं प्रझेंटेशन दाखवूनच पार पाडल्या. कोस्टल रोड मात्र कधी झालाच नाही,” अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केल.

मुंबईकरांसाठी आज अतिशय महत्वाचा दिवस आहे. कारण आज मुंबईतील कोस्टल रोडचा पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला करत आहोत. पुढच्या काही काळात संपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करू, असा मला विश्वास आहे. काही दिवसांपूर्वी माझी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली. त्यावेळी एका टप्प्याचे काम पूर्ण झालं असून दुसऱ्या टप्प्याचे काम होत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे सद्यस्थितीत मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात वाहतुककोंडींच्या समस्या सहन कराव्या लागत असल्याने काम झालेली मार्गिका बंद ठेवून फायदा नाही. त्यामुळे तात्काळ जर ही मार्गिका सुरू केल्यास अर्ध्यापेक्षा जास्त वाहतुककोंडी समस्या दूर होईल. त्यामुळे आज कोस्टल रोड सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

२००४ ते २०१४ – केंद्रात यूपीए सरकार होतं.. त्यावेळी सर्वात मोठा प्रॉब्लेम काय होता.. तर आपल्या नियमात सी लिंक बांधण्याची परवानगी होती, पण कोस्टल रोडला नव्हती.. कारण त्या ठिकाणी रेक्लमेशन करावं लागतं आणि त्यामुळे सीआरझेडची लाईन बदलते. अनेक सन्माननीय मुख्यमंत्री.. विशेषतः यूपीएचे महाराष्ट्रातले शेवटचे मुख्यमंत्री.. त्यांना कोस्टल रोडला ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणत दिल्लीला जाताना मी पाहिलं आहे.. पण ते दिल्लीला जायचे, आणि हात हलवत परत यायचे, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली.