अल्पसंख्याकांच्या मतांसाठी उद्धव ठाकरेंकडून ‘सीएए’वर राजकारण सुरू; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा थेट आरोप

सीएए कायदा काहीही झालं तरीही मागे घेतला जाणार नाही. हा कायदा कुणाचंही नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी नाही तर नागरिकत्व देण्यासाठी केलेला कायदा आहे. मोदी सरकारची गॅरंटी ही आहे की हे सरकार जे वचन देतं ते पाळतं. त्यामुळे मी हे ठामपणे सांगतो आहे की कुठल्याही परिस्थितीत हा कायदा मागे घेतला जाणार नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. तसंच त्यांनी उद्धव ठाकरे आणि असदुद्दीन ओवैसी यांच्यावरही टीका केली आहे.

पाच वर्षांपूर्वीच संसदेच्या दोन्ही सभागृहात सीएएचा कायदा मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) केंद्र सरकारने सोमवारी लागू केला. त्यासंदर्भातील अधिसूचना काढण्यात आली. ‘ हा कायदा मागे घेतला जाण्याचा काही प्रश्न नाही’ असं अमित शाह यांनी स्पष्ट केलं.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एनआयए या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. या सोबतच त्यांनी खासदार राहुल गांधी यांना देखील खुनय मंचावर येऊन सीएएवर मत व्यक्त करण्याचे आव्हान दिले आहे. शहा म्हणाले, ‘मी तुम्हाला विनंती करतो की या मुद्द्यावर राहुल गांधींची सविस्तर मुलाखत घ्या आणि सीएएला विरोध करण्याचे कारण सर्वसामान्यांना समजावून सांगा. राजकारणात तुमच्या व्यवक्तव्यावर स्पष्टीकरण देण्याची जबाबदारी तुमची असते.’ ‘जर सीएएचा निर्णय माझ्या सरकारने घेतला असेल, तर मला माझ्या पक्षाचे मत स्पष्ट करावे लागेल. तसेच या कायद्याला विरोध का करत आहेत, हेही राहुल गांधींनी स्पष्ट करावे.

“उद्धव ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. उद्धव ठाकरेंना अल्पसंख्याकांची मतं हवी आहेत म्हणून ते राजकारण करत आहेत. आमची पहिल्या दिवसापासून ही भूमिका आहे की देशाची फाळणी झाल्यानंतर जे लोक भारतात शरणार्थी म्हणून आले आहेत त्यांना नागरिकत्व मिळालं पाहिजे,” असं म्हणत अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

मुलाखतीदरम्यान गृहमंत्र्यांना विचारण्यात आले की सीएएला आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये ‘मुस्लिम विरोधी’ कायदा म्हटले जात आहे, यावर तुम्ही काय म्हणाल? अमित शहा यावर स्पष्टीकरण देताना म्हणाले की, तुम्ही या कायद्याकडे एकाच बाजून पाहू शकत नाही. 1947 मध्ये धर्माच्या आधारावर फाळणी झाली. स्थलांतरित झालेले लोक कधीही परत येऊ शकतात, असे काँग्रेस नेत्यांनी त्यावेळी म्हटले होते. मात्र तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे काँग्रेसने दिलेले आश्वासन कधीही दिलेले पूर्ण केले नाही. पण आज पंतप्रधान मोदींनी ते पूर्ण केले.