‘5 मिनिटं भाषण करायला दिली, तिथेच त्यांची..’ मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंची ‘पत’ काढली

राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या समारोपावेळी मुंबईच्या शिवाजी पार्कवर झालेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांना बोलण्यासाठी फक्त पाच मिनिटं मिळाली. यावरुन त्यांची पत कळून आली. उद्धव ठाकरे यांच्याकडे आता शिवसेना खासदार आणि आमदार उरलेले नाहीत. त्यामुळे ठाकरेंकडे उरलेल्या पक्षाच्या ताकदीप्रमाणे त्यांना भाषणासाठी फक्त पाच मिनिटं दिली. यावरुन त्यांची पत कळाली, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

इंडिया आघाडीची कालची सभा ही फॅमिली गॅदरिंग होती. भानुमतीचा गुंदा तयार होता है तसं सर्वजण होते. लोकांनी हद्दपार केलेले सर्व काल एकत्र आले होते. त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत होतं की, धरुन बांधून आलेले लोक आहेत. उबाठाच्या लोकांनी तिथे जाऊन माफी मागायला हवं होतं. सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या बरोबर बसावं लागतंय. काल एक शब्द बंद झाला, माझा तमाम हिंदू बंधू बघिणींनो, काल तो शब्द रद्द झाला. यावरुन लक्षात आलं बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, धोरण हे सगळं सोडलं म्हणून आम्हाला त्यांना सोडण्याचा विचार करावा लागला, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावलाय.

“राहुल गांधींनी ‘हिंदू धर्माची शक्ती’ असा उल्लख केला आहे. हिंदू धर्माची शक्ती समाप्त करण्याची ताकद आहे का त्यांच्याकडे? याचं उत्तर जनता त्यांना येणाऱ्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवेल. हिंदू धर्माची शक्ती संपवणारा अजून जन्माला आलेला नाही. एवढा मोठा राष्ट्रीय नेता, पण ठाण्यातल्या सभेला 500 लोकही नव्हते. फ्लॉप शो झाला. मुंब्र्यात तर ४-५ लोकही नव्हते. सगळ्या गाड्या होत्या. एक नेता तर कुणालातरी मारतही होती गर्दी झाली नव्हती म्हणून”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे म्हणाले की, महायुती सरकारने अनेक योजना हाती घेतल्याने शेतकरी, कामगार, युवक, उद्योजक, महिला यांच्या आयुष्यात बदल झाले. अनेक मोठे प्रोजेक्ट सरकारने पूर्ण केले आहेत. गेम चेंजर प्रकल्प पूर्णत्वास गेल्याने सामान्य जनता समाधानी आहे. मागच्या दीड ते पावणेदोन वर्षात अनेक निर्णय वेगाने घेतले आहेत. शिवाय आणखी नवीन प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. पाच लाख कोटींची परदेशी गुंतवणूक राज्यामध्ये आलेली आहे. केंद्राचीही मोठी मदत राज्याला झाली आहे. याचा सर्व फायदा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत होईल. महाराष्ट्रातल्या जनतेला मी शुभेच्छा देतो की, अत्यंत कमी कालावधीत त्यांनी आमच्या सरकारवर विश्वास ठेवला. आजवरच्या 55 मंत्रिमंडळ बैठकीतून 500 लोकहिताचे निर्णय घेतले.

अडीच वर्षांपूर्वीचं सरकार हे स्पीड ब्रेकर हॊते. त्यामुळे राज्यातील अनेक प्रकल्प रखडले. आता ही सर्व कामे आमच्या सरकारने सुरू केली आहेत. त्यामुळे सरकारच्या कामांचा फायदा येत्या काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत होणार आहे. राज्यातील महत्त्वाचे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. नागरिकांना हवे ते देण्याचा प्रयत्न केला आहे, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.