देशातील आगामी निवडणुका निष्पक्ष पार पाडव्यात, यासाठी निवडणूक आयोगाने मोठे पाऊल उचलले आहे. निवडणूक आयोगाने गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या ६ राज्यांतील गृहसचिवांना हटवण्याचे आदेश दिले आहेत.याशिवाय, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनाही पदावरून हटवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
ज्या अधिकाऱ्यांचा कार्यकाळ तीन वर्ष पूर्ण झाला आहे किंवा ते त्यांच्या गृह जिल्ह्यांत कार्यरत आहेत त्यांची तातडीने बदली करण्यात यावी, असा आदेश निवडणूक आयोगाने सर्व राज्यांना दिला आहे. सोमवार, १८ मार्च रोजी नवे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांच्यासह मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक पार पडली. यावेळी आयोगाने राज्य सरकारच्या निवडणुकीशी संबधित आणि कामाशी संबधित आधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश दिले आहेत.
आयोगाने अनेक राज्यांमधील उच्चपदस्थ ब्युरोक्रॅट्सच्या बदलीचे आदेश दिले आहेत. गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या सहा राज्यांतील सचिवांना निवडणूक आयोगाने हटवले आहे. मिझोराम आणि हिमाचल प्रदेशमधील सामान्य प्रशासकीय विभागाच्या सचिवांनाही हटवण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या तारखांच्या घोषणेनंतर आयोगाने महाराष्ट्र सरकारला पत्र ज्या अधिकाऱ्यांनी तीन वर्षे पूर्ण केली आहेत किंवा त्यांच्या मूळ गावी तैनात आहेत त्यांची बदली करण्यात यावी, असे सांगितले होते.
तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ पदावर असलेल्या महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी दिला होता. या आदेशामुळे मुंबई चहल यांच्यासह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्या लागणार होत्या. दरम्यान, पालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त थेट निवडणूक प्रक्रियेत सहभागी नसल्याने त्यांना बदली आदेशातून वगळावे, अशी विनंती राज्य सरकारने केली होती. राज्य सरकारने यासंदर्भातील पत्र निवडणूक आयोगाला पाठविले होते.
निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. देशात आचारसंहिता लागू झाली असून चार राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली गेलीय. देशात १९ एप्रिल ते १ जून पर्यंत ७ टप्प्यात मतदान होईल तर ४ जूनला निकाल लागणार आहे.
