एन्काऊंटर स्पेशालिस्ट माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना जन्मठेप

मुंबईचे माजी पोलीस अधिकारी आणि एनकाउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यावरील आरोप सिद्ध झाले आहेत. मुंबई हायकोर्टाने प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 2006 च्या लखन भैया एन्काउंटर प्रकरणाशी संबंधित अनेक याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने 8 नोव्हेंबर 2023 रोजी या 2006 मध्ये दाखल केलेल्या 16 अपीलांच्या सुनावणीवर निकाल राखून ठेवला होता.

कुख्यात गँगस्टर छोटा राजनचा सहकारी राम नारायण गुप्ता उर्फ लखन भैयाच्या बनावट चकमक प्रकरणी प्रदीप शर्मा दोषी असल्याचं हायकोर्टाने म्हटलं आहे. या प्रकरणात 2013 मध्ये सेशन कोर्टाने 21 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती आणि एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. वसईत राहणाऱ्या लखन भैया विरुद्ध गँगस्टर ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. 11 नोव्हेंबर 2006 रोजी मुंबई पोलिसांच्या पथकाने छोटा राजन टोळीचा संशयित सदस्य म्हणून त्याला ताब्यात घेतलं होतं. त्याच दिवशी संध्याकाळी लखन भैय्याचं पश्चिम मुंबईतील वर्सोवा येथे एन्काऊंटर झाला होता.

2006 साली झालेला लखन भैय्या एन्काउंटर बनावट चकमक असल्याचं एसआयटी चौकशीत समोर आलं होतं. रामनारायण गुप्ता ऊर्फ लखन भैया (33, रा. वसई) त्याच्याविरुद्ध गँगस्टर ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. 11 नोव्हेंबर 2006 रोजी मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. त्याच दिवशी संध्याकाळी लखन भैय्याला वर्सोवा येथे चकमकीत ठार केले होते. या कथित बनावट चकमकीचे नेतृत्व माजी प्रदीप शर्मा यांनी केले होते. याप्रकरणी 2013 मध्ये मुंबईतील सत्र न्यायालयाने या प्रकरणात 13 पोलिसांसह 21 जणांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मात्र प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता केली होती.

प्रदीप शर्मा हे मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेत एक अधिकारी होते. एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या नावावर 100 हून अधिक चकमकींचा विक्रम आहे. ते 1983 मध्ये पोलीस सेवेत रुजू झाले आणि 2019 मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

प्रदीप शर्मा यांनी 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवली, पण त्यांचा पराभव झाला. यानंतर, 25 फेब्रुवारी 2021 रोजी, रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या घरातील अँटिलिया बाहेर स्फोटक पदार्थ सापडल्याच्या प्रकरणामुळे ते चर्चेत आले. याप्रकरणी माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्माला अटक करण्यात आली होती.

कोण आहेत प्रदीप शर्मा?

प्रदीप शर्मा हे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत
चकमकफेम म्हणून त्यांची पोलीस दलात ओळख होती
त्यांनी आतापर्यंत 312 एन्काउंटरमध्ये भाग घेतला
त्यांनी 100 हून अधिक गुंडांचे एन्काउंटर केले
अंडरवर्ल्डमधील गुंडांसहित लष्कर- ए-तोयबाच्या अतिरेक्यांनाचाही त्यात समावेश आहे
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आणि डी. कंपनीच्या इशाऱ्यावर एन्काउंटर करत असल्याचा शर्मा यांच्यावर आरोप झाला होता