लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या असल्या तरी मविआच्या अडचणी संपायचं नाव घेत नाहीत. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे व शरद पवारांकडे यासंबंधी काही जागांचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, आधी आश्वासने देऊन ऐनवेळी वंचितला मविआमधून डावलण्यात आले. मविआच्या बैठकांमध्ये वंचितचे म्हणणे कधीही ऐकून घेतले गेले नाही, शिवाय त्यांना पडणार्या जागा लढवण्यासाठी देण्यात आल्या. त्यामुळे नाराज झालेल्या प्रकाश आंबेडकरांनी वेगळ्या मार्गाने वाटचाल करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी ठाकरे आणि पवारांवरुन माझा विश्वास उडाला आहे, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी मलिकार्जुन खरगे यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, “17 मार्च रोजी मुंबईतील भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाच्या सभेत तुम्हाला आणि राहुल गांधी यांना भेटून आनंद झाला. आम्ही सविस्तर संभाषण करू शकलो नाही, त्यामुळे आज मी तुम्हाला पत्र लिहित आहे. निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले असून, महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही चर्चेसाठी किंवा बैठकीसाठी निमंत्रित न करता सातत्याने बैठका घेतल्या जात आहे.
तसेच वंचित बहुजन आघाडीचा मुख्य अजेंडा – फॅसिस्ट, फुटीरतावादी, लोकशाहीविरोधी भाजप-आरएसएस सरकारला पराभूत करणे. या विचाराने मी महाराष्ट्रातील 7 जागांवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. मी तुम्हाला विनंती करतो की, महाविकास आघाडीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या जागांपैकी 7 मतदारसंघांची नावे मला द्यावीत. तुमच्या पसंतीच्या या 7 जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांना आमचा पक्ष पूर्णपणे ग्राउंडवर आणि धोरणात्मक पाठिंबा देईल, असा प्रस्तावही देण्यात आला आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसला दिलेला हा प्रस्ताव केवळ सदिच्छांचाच नाही, तर भविष्यात संभाव्य आघाडीसाठी मित्रत्वाचा हात देणाराही आहे, असेही या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, या प्रस्तावावर काँग्रेस काय प्रतिसाद देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
