लोकसभा निवडणुकीची महायुतीकडून तयारी सुरु आहे. जागा वाटपचा विषय आता अंतिम टप्प्यात आहे. वाद असलेल्या जागांबाबत निर्णय घेण्यात येत आहे. शिरूर लोकसभेच्या जागेवरून महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये संघर्ष सुरू होता. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते दिलीप मोहिते पाटील यांनी आढळराव पाटील यांना तीव्र विरोध केला होता. आता अजित पवार यांच्या शिष्टाईनंतर त्यांनी आपली तलवार म्यान केली आहे. यामुळे शिवाजी आढळराव पाटील यांचा उमेदवारीचा मार्ग मोकळा झालेला आहे. आमच्या नेत्यांनी सांगितल्यामुळे आपण एक पाऊल मागे घेत आहोत. आता शिरुरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आढळराव पाटील असतील, असे दिलीप मोहिते यांनी जाहीर केले.
माध्यमांशी बोलताना मोहिते म्हणाले, “आढळराव आणि आमच्यामध्ये जो संघर्ष होता, तो अतिशय पराकोटीचा संघर्ष होता याचा माझ्यासह माझ्या कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास झाला होता. त्यामुळं कार्यकर्त्यांच्या मनात आढळरावांसोबत जाण्याबाबत अनेक शंका-कुशंका होत्या. त्यांच्या मनातील हा संभ्रम अजित पवारांनी दूर करावा यासाठी त्यांच्यासोबत आम्ही बैठक घेतली. माझ्या घरीच ही बैठक पार पडली. यावेळी अगदी मनमोकळेप्रमाणं त्यांच्याशी कार्यकर्त्यांसह चर्चा झाली.
शेवटी पक्षाचा फायदा एखाद्या गोष्टीने होणार असेल तर माझ्या भावना आणि मत मी बाजूला ठेवण्याचा विचार या निमित्ताने केला आहे. हे सर्व करताना कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावं आणि ही सर्व प्रचाराची सूत्रे वळसे पाटील यांच्याकडे द्यावीत, त्यांच्या नेतृत्वात मी काम करायला तयार असल्याची भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मांडली” असं दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितलं.
पक्षनेतृत्व एकदा मोठा निर्णय घेत असेल, तर तो मान्य केला पाहिजे. कारण त्यात पक्षाचे हीत असते. शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवाजी आढळराव पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे पक्ष त्यांना उमेदवारी देणार आहे. मी वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार पक्षाच्या उमेदवाराचे काम करणार असल्याचं मोहिते यांनी सांगितलं.
