विदर्भ-मराठवाड्यात आजही अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा

गेल्या ४८ तासांत राज्यातील हवामानात सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपातील पाऊस आणि गारपीठ अनुभवायला मिळत आहे, तर काही भागात लोक उकाड्याने हैराण झाले आहेत. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या २४ तासात विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे, तर २१ मार्चपासून पुणे परिसरात कमाल आणि किमान तापमानात १-२ अंशानी वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. आज भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता वर्तवली असून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.दुसरीकडे मुंबई पुण्यातील तापमानात किंचित घट होऊन रात्री थंडी पडण्याची शक्यता आहे. विदर्भ वगळता राज्यातील इतर भागातील हवामान कोरडे राहणार, अशी माहिती देखील हवामान खात्याने दिली आहे.तर सध्या विदर्भावर चक्राकार वारे वाहत असून कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही मंगळवारी(ता.१९) चंद्रपूर, नागपूर, वर्धा जिल्हात काही ठिकाणी गारपिटीसह पाऊस झाला.

सध्या विदर्भासह लगतच्या भागावर चक्राकार वारे वाहत आहेत. ज्यामुळं कर्नाटकाच्या दक्षिण क्षेत्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती झाली आहे. विदर्भ आणि नजीकच्या भागांमधील हवामानाची ही स्थिती पाहता इथं हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केला असून, राज्याच्या उर्वरित भागात मात्र उन्हाचा तडाखा आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

विदर्भासह मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस, मराठवाड्यात वीजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा, आणि मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यात नांदेड जिल्ह्यात मेघगर्जनेसह गारपीच होण्याची शक्यता आहे. उद्याही विदर्भ वगळता राज्यात इतर ठिकाणी हवामान कोरडे राहणार आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. यासह पुणे आणि लगतच्या परिसरात तापमानात वाढ बघावयास मिळेल. या भागात हवामान कोरडे तसेच आकाश निरभ्र राहणार आहे. यामुळे पुढील आठवड्यात कमाल आणि किमान अशा दोन्ही तापमानात १ ते २ अंशांनी वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागातील शास्त्रज्ञांनी दिली आहे.