लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. राज्यात आणि देशभरात आता प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. प्रचाराची ही रणधुमाळी आगामी काळात जास्त तीव्र होण्याची चिन्हं आहेत. सध्या प्रत्येक पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत आहे. प्रत्येक पक्षांकडून उमेदवार जाहीर झाल्यानंतर प्रचाराला जास्त गती मिळणार आहे. त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तुटून पडण्याची एकही संधी सोडताना दिसणार नाहीत. त्याला आतापासूनच सुरुवात झाली आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी एक व्यंगचित्र ट्विट केलं आहे. या व्यंगचित्रातून प्रसाद लाड यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.
व्यंगचित्रात उद्धव ठाकरे यांच्या हातात आदित्य ठाकरे यांचा फोटो दाखवण्यात आलाय. “आमच्या आदित्यला पाहिले का हो तुम्ही कुठे? ऐन निवडणुकीच्या काळात गेले दीड महिने गायब आहे हो…”, असं उद्धव ठाकरे व्यंगचित्रात विचारत असल्याचं दाखवण्यात आलंय. तर इतर दोन जण “दारुण पराभव समोर दिसत असल्यामुळे लपून बसला असेल…”, असं बोलताना व्यंगचित्रात दाखवलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून ते चर्चेत आणि माध्यमांत दिसत नाहीत. हाच धागा पकडून लाड यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली. लाड यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर एक व्यंगचित्र पोस्ट करत लिहिलं की, बाळराजे बसले कुठे दडून? मागील काही दिवसांपासून न कुठली प्रेस कॉन्फरन्स ना कुठली सभा. बाबांच्या मागे मागे चालणाऱ्या बाळराजांना अहो कुठेतरी शोधा!, असं खोचक टीका त्यांनी केली.
