मुंबईनंतर चेन्नईनेही बदलला कॅप्टन; मराठमोळा ऋतुराज गायकवाडचेन्नईचा कर्णधार

चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने आयपीएल सुरू होण्याच्या एक दिवस आधी सर्वात मोठा धक्का दिला आहे. चेन्नईचा नियमित कर्णधार एम एस धोनीने त्याचे कर्णधारपद युवा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडकडे सोपवले आहे. त्यामुळे आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचा नवा कर्णधार हा मराठमोळा ऋतुराज गायकवाड असणार आहे. सीएसकेचा पहिला सामना शुक्रवारी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीविरुद्ध होणार आहे. कॅप्टन्सच्या फोटोशूटनंतर चेन्नई संघाच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरून ही घोषणा करण्यात आली आहे.

प्रत्येक सीझनप्रमाणेच आयपीएल सुरू होण्यापूर्वी सर्व संघांचे कर्णधार ट्रॉफीसोबत फोटोशूट करतात. या हंगामातही असेच घडले, जिथे सर्व 10 संघांच्या कर्णधारांना फोटोशूटसाठी बोलावण्यात आले होते. यावेळी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी या फोटोमध्ये दिसला नाही. त्याच्या जागी संघाचा युवा सलामीवीर रुतुराज गायकवाडला पाठवण्यात आले. गायकवाड या हंगामात संघाचे नेतृत्व करणार असल्याचे आता चेन्नई सुपर किंग्जकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

चेन्नई सुपर किंग्सकडून ऋतुराज गायकवाडच्या कर्णधारपदाबाबत स्टेटमेंट जारी करण्यात आले आहे. “एमएस धोनीन आयपीएल 2024 आधी संघाची धुरा ऋतुराज गायकवाड याच्याकडे सोपवली आहे. ऋतुराज गायकवाड 2019 पासून संघासोबत आहे. त्यानं आतापर्यंत 52 धावा खेळल्या आहेत.”

आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून महेंद्रसिंग धोनी चेन्नईचा कर्णधार आहे. त्याने संघाला आतापर्यंत पाचवेळा आयपीएलचं जेतेपद मिळवून दिलं आहे. चेन्नईच्या या कामगिरीची बरोबरी फक्त मुंबई इंडियन्स करु शकला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. महेंद्रसिंह धोनीच्या वाढत्या वयामुळे आयपीएलच्या प्रत्येक हंगामात त्याच्या खेळण्याबद्दल शंका व्यक्त केली जाते. सध्याचा हंगाम त्याचा शेवटचा असेल असा अंदाज आहे. दरम्यान मागील हंगामात संघाचं कर्णधारपर रवींद्र जाडेजाकडे सोपवण्यात आलं होतं. पण त्याला फारसं यश मिळत नसल्याने पुन्हा एकदा धोनीकडेच नेतृत्व सोपवण्यात आलं होतं.