शिवतीर्थावर होणार राज गर्जना; मनसेच्या पाडवा मेळाव्याला मुंबई महापालिकेची परवानगी

शिवतीर्थावर होणार राज गर्जना; मनसेच्या पाडवा मेळाव्याला मुंबई महापालिकेची पर

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आगामी लोकसभेच्या दृष्टीने मनसेने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दोनच दिवसांपूर्वी मनसे-भाजप युतीच्या हालचालींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर मनसे महायुतीत सहभागी होण्याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा 9 एप्रिल रोजी मुंबईमधील शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. या मेळाव्याला मुंबई महापालिकेने परवानगी दिली आहे.

या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार? कुणावर निशाणा साधणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे या मेळाव्यात आपली लोकसभेबाबतची रणनिती स्पष्ट करण्याची शक्यता आहे.दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा 9 एप्रिल रोजी दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. मनसेच्या या पाडवा मेळाव्याला मुंबई पालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच शिवाजी पार्कवर मनसेचा मेळावा होणार आहे. राज ठाकरे या मेळाव्यातूनच पक्षाची भूमिका स्पष्ट करतील. या दिवशी मनसे लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फोडण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे यांची भूमिका ऐकण्यासाठी पक्षाचे हजारो कार्यकर्ते मुंबईत एकत्र यावेत, या उद्देशाने 9 एप्रिल 2016 ला मुंबईत पहिला पाडवा मेळावा आयोजित केला होता. या पाडवा मेळाव्याच्या माध्यमातून मनसे कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी सुरू केला होता.लवकरच मनसेही महायुतीत सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मेळाव्याला वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे. या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार? आगामी लोकसभेच्या संदर्भात मोठी घोषणा करणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.