मॉस्कोचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अत्यंत सुनियोजित निवडणुकीत देशावर आपली पकड मजबूत केल्यानंतर काही दिवसांनी मॉस्कोच्या किनाऱ्यावरील एका मोठ्या कॉन्सर्ट हॉलमध्ये घुसून दहशतवाद्यांनी पाहुण्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात ६० जण ठार झाले आहेत. तर, १४५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. इस्लामिक स्टेटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
शुक्रवारी (२२ मार्च) रात्री हा हल्ला झाला. इस्लामिक स्टेटने (IS) याची जबाबदारी घेतली आहे. लष्कराच्या गणवेशात आलेल्या पाच दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आणि बॉम्ब फेकले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले- मॉस्कोमधील दहशतवादी हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. पीडितांच्या कुटुंबियांसोबत आमच्या संवेदना आहेत. या दु:खाच्या काळात भारत रशियाचे सरकार आणि लोकांच्या पाठीशी उभा आहे.
दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबार आणि बॉम्बस्फोटाचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओ पाहून अनेकांना धडकी भरली आहे. गोळीबार आणि बॉम्बस्फोटाची जबाबदारी इस्लामिक स्टेटने या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.दहशतवादी इंगुशेतियाचे मूळ रहिवासी असल्याचा दावा रशियन मीडियाने केला आहे. लष्करी गणवेश घातलेले दहशतवादी इमारतीत घुसले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला. जो समोर दिसत होता त्याला गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यानंतर स्फोट झाला, त्यामुळे कॉन्सर्ट हॉलला आग लागली होती.
कॉन्सर्ट हॉलमध्ये हल्ला झाल्यानंतर काही वेळातच रशियन लष्कराचे जवान घटनास्थळी पोहोचले. यानंतर रशियन लष्करांनी दहशतवादविरोधी कारवाई सुरु केली. दरम्यान, अमेरिकन दूतावासाने या हल्ल्याचा आधीच इशारा दिला होता, अशी माहितीही सांगण्यात येत आहे. रशियामधील काही वर्षांतील हा हल्ला सर्वात प्राणघातक हल्ला असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, रशियाची सर्वोच्च तपास यंत्रणा गोळीबार, स्फोट आणि आगीच्या घटनेचा दहशतवादी हल्ला म्हणून तपास करत आहे. या हल्ल्यामागं कोणाचा हात असू शकतो हे सांगितलं नसलं, तरी तपास समितीनं आरोपांची फौजदारी चौकशी सुरू केल्याचं सांगितलं.
