संसदेत पैसे घेऊन प्रश्न विचारल्याच्या प्रकरणात तृणमूलच्या माजी खासदार महुआ मोईत्रा यांच्या घरावर सीबीआयनं छापा टाकला आहे. कोलकात्यातील अलिपूर भागातील रत्नावली नावाच्या इमारतीत नवव्या मजल्यावर महुआ मोईत्रा यांचा फ्लॅट आहे. इथे सीबीआयने छापा टाकला असून, मोईत्रांशी संबंधित कोलकात्यातील इतर ठिकाणीही तपासणी सुरू आहे.
पैसे घेतल्याच्या आणि संसदेत प्रश्न विचारल्याच्या आरोपावरून सीबीआयची टीम त्यांच्या घराची झडती घेत आहे (कॅश फॉर क्वेरी केस). या प्रकरणात, महुआ यांचे 8 डिसेंबर 2023 रोजी खासदार पद गेले होते.वास्तविक, 19 मार्च रोजी लोकपालने सीबीआयला कॅश फॉर क्वेरी प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. 6 महिन्यांत केस रिपोर्ट दाखल करा आणि दर महिन्याला स्टेटस रिपोर्ट सादर करा, असेही सांगण्यात आले.
सीबीआयने शुक्रवारी महुआ मोईत्रा यांच्यावर कॅश फॉर क्वेरी प्रकरणात एफआयआर नोंदवला होता. लोकपालच्या निर्देशानुसार सीबीआयने हा एफआयआर नोंदवला आहे. ‘कॅश फॉर क्वेरी’ प्रकरणात माजी खासदार महुआ मोईत्रा यांच्यावरील आरोपांच्या सर्व पैलूंची चौकशी करण्याचे आदेश लोकपालने मंगळवारी सीबीआयला दिले होते. तसेच या प्रकरणी सहा महिन्यांत अहवाल सादर करण्यास सांगितले होते.
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्षांकडे महुआ यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. महुआ यांनी अदानी यांच्याविरोधात संसदेत प्रश्न विचारण्यासाठी दुबईतील व्यापारी दर्शन हिरानंदानी यांच्याकडून रोख रक्कम आणि भेटवस्तू घेतल्या होत्या, असे तक्रारीत म्हटले होते. मात्र, मोईत्रा यांनी हे दावे फेटाळून लावले असून अदानी समूहाच्या सौद्यांविषयी प्रश्न उपस्थित केल्यामुळे लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला आहे. संसदेत महुआ मोईत्रा यांनी 61 प्रश्न विचारले त्यापैकी 50 प्रश्न अदानी समुहाशी संबंधित होते असं दुबे म्हणतात.
