काँग्रेस उमेदवाराचा काँग्रेसच्या नेत्यांवर विश्वास उरलेला दिसत नाही का? गौरव बापट यांचा सवाल

लोकसभा निवडणुकीच्या रणधुणाळीला सुरुवात झाली असतानाच भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे छायाचित्र वापरत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमातून ‘जो आमदार कसब्याचा, तोच खासदार पुण्याचा’ अशा आशयाचा मजकूर प्रसारित केला आहे. त्याला दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे चिरंजीव गौरव बापट यांनी आक्षेप घेतला आहे. काँग्रेस उमेदवाराचा त्यांच्या पक्षातील नेत्यांवर विश्वास नसल्यामुळेच त्यांच्यावर भाजप नेत्यांची छायाचित्र वापरण्याची वेळ आल्याची टीका गौरव बापट यांनी केली.

गौरव बापट म्हणाले की, गिरीश बापटांचा फोटो वापरणं खूपच दुर्दैवी आहे. याचा निषेधच करतो. परंतु हा फोटो वापरला आहे, त्यांचा कॉंग्रेसच्या नेत्यांवर विश्वास राहिलेला दिसत नाही. जे भाजपचे पाच वेळा आमदार होते, दोन वेळा खासदार होते, कॅबिनेट मंत्री होते. त्यांचा फोटो आपल्या प्रचारासाठी वापरणं हे कुठेतरी कॉंग्रेच्याच नेत्यांवर विश्वास नसल्याचे दिसून येतंय. त्यांची पराभूत मानसिकता दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामावर त्यांचा विश्वास बसला आहे. विरोधकांना विरोध म्हणून करावं लागतंय. त्यामुळे आम्ही हे हास्यास्पद म्हणून सोडून देतोय, असे गौरव बापट म्हणाले.

पुढे ते म्हणाले देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेने दाखवलेले प्रेम आणि विश्वास या जोरावरच भारतीय जनता पार्टीचे चारशेहून अधिक खासदार 100% निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ हे देखील मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असा ठाम विश्वास भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये आहे आमचे संपूर्ण हे भारतीय जनता पार्टीच्या प्रचारात आगामी काळात हिरीरीने सहभाग घेऊन श्री मोहोळ यांना खासदार केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नसल्याचे गौरव बापट म्हणाले.

गिरीश बापट यांच्या निधनानंतर होणारी ही पुण्यातील पहिलीच लोकसभा निवडणूक आहे. या निवडणुकीत संपूर्ण बापट कुटुंब हे भाजपसोबत असून मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी आम्ही मैदानात उतरणार असल्याचंही ते म्हणाले.