मॉस्कोमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल ६० लोकांचा मृत्यू झाला असून १४५ पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. या दहशतवादी हल्ल्यामुळे मॉस्को शहर हादरले आहे. मॉस्कोच्या एका कॉन्सर्ट हॉलमध्ये हजारो लोक एकत्र जमले असतांनी हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट ग्रुपने घेतली आहे. मॉस्कोतील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत भारत रशियाच्या पाठिशी उभा असल्याचे म्हटले आहे.
“आम्ही मॉस्कोमधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. पीडितांच्या कुटुंबियांच्या दुःखात सामील आहोत. या दुःखाच्या प्रसंगी भारत सरकार रशियन फेडरेशनच्या लोकांसोबत एकजुटीने उभा आहे,” असा दिलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन नागरिकांना दिला आहे.मॉस्कोजवळील क्रोकस सिटी हॉलमध्ये एका कार्यक्रमात मास्क घातलेल्या पाच बंदूकधाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. या हल्ल्यात किमान 60 लोक ठार आणि 145 अधिक जखमी झाले आहेत.
रशियन वृत्तानुसार, या हल्लेखोरांनी मोठ्या प्रणाणात स्फोटके फोडली. कॉन्सर्ट हॉलमध्ये आग लावली. तर सोशल मीडियावरील व्हिडीओमध्ये इमारतीवरून धुराचे मोठमोठे लोट दिसून येत आहेत. हे हल्लेखोर सैनिकांच्या गणवेशात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. रशियन सैन्यानेही दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे.
रशियाच्या मीडियाने दहशतवाद्यांचे फोटो जारी केले आहेत. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, दहशतवादी हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्यानुसार म्हटलेय हल्लेखोर आशियाई आणि कॉकेशियाई नागरिकांसारखे दिसत होते. याशिवाय हल्लेखोर रशिया नव्हे तर परदेशी भाषेत बातचीत करत होते. रशियाच्या मीडियाने दावा केलाय की, दहशतवादी इंगुशेटियातील स्थानिक आहेत.
