लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपाययोजना केल्या जात असताना, मतदान केंद्रावर बारापैकी कुठलाही एक पुरावा दाखविल्यास मतदान करता येणार आहे. मतदानाच्या पाच दिवस अगोदर मतदारांच्या घरी मतदान पावती पोहोचणार असून, त्यावर मतदान केंद्र, मतदार यादीतील नाव व क्रमांक नमूद केलेला असणार आहे. त्यामुळे मतदारांना मतदान करणे अधिक सुलभ होईल.
लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदारांना छायाचित्रासह ओळखपत्र दिले आहे. मतदान केंद्रावर मतदार आपली ओळख पटविण्यासाठी छायाचित्र मतदार ओळखपत्र सादर करतील. परंतु, ज्यांच्याकडे मतदार छायाचित्र ओळखपत्र नसेल त्यांनी आपली ओळख पटविण्यासाठी १२ प्रकारची कागदपत्रे पुरावा म्हणून सादर करावीत.
छायाचित्रासह मतदार ओळखपत्राद्वारे मतदाराची ओळख पटत असेल तर मतदार ओळखपत्रातील कारकुनी त्रुटी, शब्दलेखनातील चुका इत्यादी किरकोळ विसंगती दुर्लक्षित कराव्यात, असे आयोगाने म्हटले आहे. प्रवासी भारतीय मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा केवळ मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे. मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राचा, मतदार यादीतील अनुक्रमांक, मतदानाची तारीख व वेळ इत्यादी माहिती उपलब्ध होण्यासाठी फोटो वोटर स्लीपऐवजी मतदार माहिती चिठ्ठी वितरणाच्या सूचना आयोगाने केल्या आहेत. सदर चिठ्ठी मतदानाच्या पाच दिवस अगोदर वाटप केली जाईल. परंतु, मतदारांना ओळखीचा पुरावा म्हणून सदर चिठ्ठी ग्राह्य असणार नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असेही प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
असे आहेत १२ प्रकारचे पुरावे
– आधार कार्ड
– मनरेगा जॉब कार्ड
– बँक/पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या छायाचित्रासह पासबुक
– कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
– वाहनचालक परवाना
– पॅनकार्ड
– नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर स्मार्टकार्ड
– पासपोर्ट
– फोटोसह पेन्शन दस्तऐवज
– केंद्र, राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांचे सेवा ओळखपत्र
– खासदारांचे, आमदारांचे अधिकृत ओळखपत्र
– विशेष विकलांग प्रमाणपत्र
