राज्यातील धरणसाठ्यात फक्त ४० टक्के पाणीसाठा शिल्लक; तब्बल ९४० टँकरने पाणीपुरवठा

राज्यातील जलसाठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे, राज्यातील धरणांमधील जलसाठ्यात कमतरता निर्माण झाली आहे. धरणसाठ्यात फक्त ४० टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. चिंताजनकबाब म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत हा जलसाठा प्रचंड कमी आहे. यंदाचा उन्हाळा मराठवाडा आणि विदर्भासाठी आणखी चिंताजनक आहे. कारण,मराठवाड्यात फक्त २१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाळा सुरु होण्यासाठी अजून ३ महिने शिल्लक आहेत.

मराठवाड्यातील ग्रामीण भागांसह शहरात पाणीटंचाईच्या झळा वाढल्या आहेत. टंचाईमुळे अनेक गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात टँकर फेऱ्या सर्वाधिक प्रमाणात वाढल्या आहेत. विभागातील मोठ्या ११ धरणांत ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ७५ मध्यम प्रकल्पांत १३.३९ टक्के, ७४९ लघु प्रकल्पात १३.७१ टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यात २७.९९ टक्के आणि तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २७ बंधाऱ्यात १९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सहायक मुख्य अभियंता यांनी दिली आहे.

राज्यातील अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली असल्याने, टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. राज्यातील ८५९ गावात आणि २०५४ वाड्यांवर तब्बल ९४० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यात ६५ शासकीय आणि ८७५ खाजगी टँकरचा समावेश आहे. ज्यात सर्वाधिक पाण्याचे टँकरने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरु आहे. एकूण टँकरची संख्या पाहिल्यास पालघर जिल्ह्यात १३ टँकर, नाशिक १८९ टँकर, धुळे ४ टँकर, जळगांव २९ टँकर, अहमदनगर ४९ टँकर, पुणे ४९ टँकर, सातारा ११६, सांगली ७२ टँकर, सोलापूर २१ टँकर, संभाजीनगर २०० टँकर, जालना १७६ टँकर, बीड २ टँकर, लातूर ३टँकर, बुलढाणा १७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

राज्यात जलसंपदा विभागाकडील लहान, मध्यम व मोठे अशा एकूण दोन हजार ९९४ प्रकल्पांत १४२२.१२ टीएमसीपैकी ७२५.८३ टीएमसी (२०.५५९.३२ दशलक्ष घनमीटर) म्हणजेच ५० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या महिन्यात २३ जानेवारीच्या दरम्यान धरणांत ८०६.६६ टीएमसी म्हणजेच ५६ टक्के पाणीसाठा होता. गेल्या वर्षी याच काळात ७२.७० टक्के पाणीसाठा होता. त्या तुलनेत जवळपास २१.७० टक्क्यांनी पाणीसाठा यंदा कमी आहे.