राज्यात उष्णतेची लाट; तापमानाचा पारा ४० अंशाकडे

सुर्य आग ओकायला लागल्याने उन्हाच्या झळा तापदायक ठरू लागल्या आहेत. तापमानाचा पारा चाळीशीकडे वाटचाल करत असून, काही ठिकाणी कमाल तापमान ३९ अंशांच्या पार गेले आहे. मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी ४०.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भापासून उत्तर केरळपर्यंत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात आकाश स्वच्छ होत असून, सुर्यप्रकाश थेट जमीनीवर आल्याने उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. उकाड्यात वाढ झाल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत.

मुंबईच्या तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. उपनगरात सलग दोन दिवस तापमानाने ३८ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात तापमानात वाढ झाली. दिवसा आणि रात्रीच्या तापमानात वाढ नोंदवण्यात आली. हवेतील कमी आर्द्रतेमुळे, तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा फक्त एक अंश सेल्सिअस कमी आहे. बुधवारीही उपनगरातील कमाल तापमान ३८.७ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते.

राज्यातील तापमानात गेल्या काही दिवसांपासून चढउतार पाहायला मिळत आहेत. कुठे अवकाळी पाऊस तर कुठे प्रचंड उकाडा यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. राज्यात पुढील ४-५ दिवसांत महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये कमाल तापमानात २-३ अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होईल. २६- २७ मार्च २०२४ या काळात कोकणातील काही भागांमध्ये उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

महाराष्ट्रात होळी साजरी होत असतानाच उष्णता वाढणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. कोरडय़ा हवामानामुळे कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तामिळनाडू ते विदर्भापर्यंत द्रोणीय स्थिती कायम आहे. त्याचा प्रभाव कमी होत चालला आहे. त्यामुळे उकाडा वाढला आहे. कमाल तापमानातही वाढ होत आहे.