धाडसी निर्णय घेतला नसता तर विरोधी पक्षात बोंबलत बसलो असतो – अशोक चव्हाण

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने ४०० पार असे लक्ष्य ठेवले असून, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते जोमाने तयारीला लागले आहेत. भाजपा एकामागून एक उमेदवारी यादी जाहीर करत असून, अनेक ठिकाणी धक्कातंत्र वापरत असल्याचे दिसत आहे.भाजपामध्ये इन्कमिंगही मोठ्या प्रमाणात सुरू असून, यावरून विरोधक सातत्याने टीका करत आहेत. यातच आता काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश करत थेट राज्यसभा खासदारकी मिळालेल्या अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला खोचक टोला लगावला आहे.

“जर ८० ते ९० टक्के लोकांच्या मनामध्ये फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील तर माझ्या मनातदेखील दुसरे कोणी असण्याचे कारण नाही. त्यामुळे मी हा धाडसी निर्णय घेतला. भाजपात येण्याचा निर्णय घेतला नसता तर मी पाच वर्ष विरोधात राहिलो असतो. दिल्लीत आमचे सरकार येण्याचा प्रश्नच नव्हता. मग काय करायचे? विरोधी पक्षात बोंबलत बसलो असतो”, असे अशोक चव्हाण म्हणाले.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपाकडून त्यांची राज्यसभेवर वर्णी लागली. यातच काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकाचे बिगुल वाजले. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची यादी जाहीर केली. उमेदवारांच्या यादी जाहीर केल्यानंतर स्टार प्रचारकांची यादीही भाजपाने जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातून अशोक चव्हाण यांचेदेखील नाव आहे. त्यामुळे आता काँग्रेसमधून भाजपात आलेले अशोक चव्हाण काँग्रेस उमेदवारांच्या विरोधात प्रचार करत आहेत.