विदर्भ, मराठवाड्यासाठी हवामान विभागाचा इशारा; तापमानात होणार वाढ

सूर्य तळपू लागताच राज्यात उन्हाच्या झळा तापदायक होऊ लागल्या आहेत. तापमानाचा पारा ४१ अंशांच्या पार गेल्याने महाराष्ट्र तापला आहे. विदर्भातील बुधवारी अकोल्यात सर्वाधिक ४२.८ अंश सेल्सिअसवर गेले. आज (ता. २८) कमाल तापमानातील वाढ टिकून राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे.विदर्भात वाढत्या उन्हापासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. ३१ तारखेला अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर जिल्ह्यात वीजांचा कटकडाट, मेघ गर्जना, सोसाट्याच्या वाऱ्यासोबत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मराठवाड्यात देखील पुढील दोन दिवस कमाल-किमान तापमानातील वाढीचा कल कायम राहण्याचा अंदाज आहे. बुधवारी अकोला, अमरावती, बुलडाणा, ब्रह्मपुरी, वर्धा, यवतमाळ, बीड, नांदेड, परभणी, जळगाव, जेऊर, मालेगाव, सोलापूर या ठिकाणी ४० अंश सेल्सिअस आणि त्याहून जास्त तापमानाची नोंद झाली आहे.जळगाव, नाशिक, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत पुढील दोन दिवस रात्रीच्या तापमानात वाढ होऊन रात्रीही उकाडा वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना दिवसा आणि रात्रीही असह्य उकाड्याचा सामना करावा लागणार आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरात मंगळवारी कमाल तापमान ३९.५ अंश सेल्सियसवर गेल्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे. यंदाच्या मोसमात हे तापमान प्रथमच ३९ अंशांवर पोहोचले आहे. दुपारच्या सत्रात सर्वाधिक उन्हाच्या झळांनी अंगाची लाहीलाही झाली.पंख्यांमधून उष्ण हवा येत आहे. दिवस-रात्रीचा उकाडा वाढल्याने शहरवासीय हैराण झाले आहेत. २२ मार्च रोजी ३५.५ अंश तापमान होते. त्यात ५ दिवसांत ४ अंशांची वाढ झाली.

३० तारखेला मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर विदर्भात, अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर जिल्ह्यात वीजांचा कटकडाट, मेघ गर्जना, सोसाट्याच्या वाऱ्यासोबत पाऊस पडण्याची शक्यता आहे.