महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीनंतर मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याचे बोलले जाते. मनसेने महायुतीसमोर लोकसभेच्या तीन जागांचा प्रस्ताव ठेवल्याची चर्चा आहे. मात्र, या प्रस्तावावर भाजपाच्या नेत्यांनी अद्याप काही प्रतिक्रिया दिलेली नाही. यातच आता शिवसेना नेते, खासदार राहुल शेवाळे यांनी मनसेच्या महायुतीतील सहभागाबद्दल मोठे विधान केले आहे.
“मनसेचा लवकरच महायुतीत सहभाग होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यासंदर्भातील निर्णयाची घोषणा करतील. पण आम्ही यापूर्वीच शिवसेनेच्या वतीने आमची भूमिका स्पष्ट केली आहे. राज ठाकरेंचं नेतृत्व तिन्ही पक्षातील लोकांना मान्य,आम्ही मनसेचं स्वागत करतो. कारण मनसे हा शिवसेनेच्या विचारसरणीचा पक्ष आहे. हा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचे आणि हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाणारा आहे,” असं राहुल शेवाळे म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले की, मनसे लवकरच महायुतीत सहभाग होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यासंदर्भातील निर्णयाची घोषणा करतील. पण आम्ही यापूर्वीच शिवसेनेच्या वतीने आमची भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही मनसेचं स्वागत करतो. कारण मनसे हा शिवसेनेच्या विचारसरणीचा पक्ष आहे. हा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचे आणि हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाणारा आहे.
काही दिवसांपूर्वी शिवतीर्थवर पार पडलेल्या बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांनी सांगितलं की, “राजकारणात संयम आणि धैर्य असतो तोच पुढे जातो. थोडा संयम ठेवल्यानंतर सर्व प्रश्नांची उतरं मिळतील”. मनसे शिवसेनेत सहभागी होणार असून, राज ठाकरे नेतृत्व करणार असल्याच्या प्रस्तावाचीही चर्चा सुरु आहे. त्यावर बाळा नांदगावकर म्हणाले की, “माध्यमांमध्ये हे वृत्त आलं. आम्हाला त्याची कल्पना नाही. यासंदर्भात चर्चा झाली असेल तर संबंधित पक्षप्रमुखांना याची माहिती असावी. आमच्याशी यासंदर्भात चर्चा झालेली नाही”.
महायुतीसमोर मनसेने काय प्रस्ताव ठेवला? याबाबत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सूचक विधान केले होते. ते म्हणाले होते, “आम्ही तीन जागा मागितल्या होत्या. त्यातील दोन जागांवर चर्चा सुरू आहे. मात्र, यासंदर्भात राज ठाकरे आणि महायुतीमध्ये असणारे नेते निर्णय घेतील”, असे बाळा नांदगावकर म्हणाले होते.
