राज्यात तब्बल ३३ जणांना उष्माघाताचा फटका; आरोग्य विभागाकडून सावधतेचा इशारा

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण एकीकडे जोरात तापत असतानाच दुसरीकडे वाढत्या तापमानाचा फटका विदर्भासह राज्याच्या वेगवेगळ्या भागाला बसत असून उष्माघातामुळे यंदा मार्च महिन्यातच सुमारे 33 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोग्य विभागाने उष्माघाताची दखल घेऊन काळजी घेण्याबाबतचा कृती आराखडा तायार केला असून याबाबतची माहिती राज्यातील विविध महापालिकांसह विविध यंत्रणांना पाठवली आहे.

छत्रपती संभाजीनगमध्ये उष्माघाताचे १०० रुग्ण आढळले असून छत्रपती संभाजीनगरमध्ये पारा ३९ अंशावर पोहचलाय. तर चंद्रपूरसह विदर्भात दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज सांगण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांकडून सकाळच्या सत्रात प्रचारावर भर देण्यात आला आहे. अशा उन्हात ताप, चक्कर, उलटीचा त्रास, डोखेदुखी जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

आरोग्य विभागाने यंदा फेब्रुवारी महिन्यात याबाबतचा कृती आराखडा तयार केला असून आरोग्य यंत्रणेला सतर्क करण्यात आले आहे. तसेच लोकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत व्यापक जनजागृती कार्यक्रमही हाती घेण्यात आल्याचे आरोग्य विभागाचे संचालक डॉ नितीन अंबाडेकर यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाशल्यचिकित्सकांच्या अखत्यारितील आरोग्य यंत्रणांनी व्यापक सर्वेक्षण करणे तसेच उष्णतेसदर्भातील आजारांचे सर्वेक्षण करून नियमितपणे आपले अहवाल आरोग्य विभागाच्या पोर्टलवर संकलित करण्यास सांगण्यात आले आहे.

हिट स्ट्रोक काय आहे?
हिट स्ट्रोकमध्ये अधिक गरमीमुळं शरीराचे तापमान वाढू शकते. डिहायड्रेशनमुळं व पाण्याच्या कमतरतेमुळं हिट स्ट्रोक होऊ शकतो. योग्य वेळी उपचार न केल्यास रुग्णांचा जीव जावू शकतो. हिट स्ट्रोक अधिक उष्णता आणि तापमानाचा पारा वाढल्यामुळं होऊ शकतो. या व्यतिरिक्त त्याची अन्य कारणेही असू शकतात. थायरॉइडचे असंतुलन, शरीरात ब्लड शुगर कमी होणे अशा कारणांमुळंही हिट स्ट्रोक होऊ शकतो.

रविवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नगर जिल्ह्यातील जेऊर येथे देशातील उच्चांकी ४२.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे आहे.आज (ता. १) मध्य महाराष्ट्रातील सोलापूर मराठवाड्यातील धाराशीव, लातूर, नांदेड जिल्ह्यात उष्ण रात्रीचा इशारा (येलो अलर्ट), देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उद्यापासून (ता. २) विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.