गेल्या 10 वर्षात झाले, तो फक्त ट्रेलर; येत्या काळात आणखी बदल घडवायचे आहेत – पंतप्रधान नरेंद्र मोदी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 90 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुंबईतील कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली. आरबीआयचा गेल्या 90 वर्षातील प्रवासाचा कार्यक्रम नरिमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स येथे आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाचे उद्घाटन नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, दहा वर्षांपूर्वी बँकिंग क्षेत्र खूप तणावात होते. पण आता बँकिंग व्यवस्था नफ्यात आहे आणि विक्रमी पातळीवर कर्ज देत आहे. भारतीय बँकिंग क्षेत्रातील बदल हा केस स्टडी आहे.

यावेळी पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटलं की, एकेकाळी तोट्यातील अर्थव्यवस्था आज नफ्यात आहे. बँकीग व्यवस्थेतील स्थित्यांतर हा अभ्यासाचा विषय आहे. 2014 आधी बँकीग व्यवस्था डगमगली होती. गेल्या 10 वर्षात बँकींग क्षेत्रात मोठ्या सुधारणा झाल्या आहेत. गेल्या 10 वर्षात झाले, तो फक्त ट्रेलर आहे. येत्या काळात आणखी बदल घडवायचे आहेत, असं मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले की, 2014 मध्ये जेव्हा मी आरबीआयला 80 वर्षे पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो होतो तेव्हा परिस्थिती खूप वेगळी होती. संपूर्ण बँकिंग क्षेत्र समस्या आणि आव्हानांशी झुंजत होता. परिस्थिती इतकी वाईट होती की, सार्वजनिक क्षेत्रातील बँका देशाच्या आर्थिक प्रगतीला पुरेशी चालना देऊ शकल्या नाहीत. मात्र, आज भारताच्या बँकिंग व्यवस्थेकडे जगातील एक मजबूत आणि टिकाऊ बँकिंग प्रणाली म्हणून पाहिले जात आहे.

आरबीआयची क्रेडिक ग्रोथ ही 15 टक्क्यांवर गेली आहे. देशात 52 कोटी जनधन खाते आहेत. ज्यात 55 टक्के खाते ही महिल्यांच्या नावावर आहेत. मत्स्यव्यवसाय आणि शेती या क्षेत्रातही वाढ होते आहे. किसान क्रेडिट कार्डमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. कोओपरिटिव्ह सेक्टरला चालना मिळते आहे. जगभरात बँकातून 12,000 कोटींचे ट्रान्सझॅक्शन होते आहे, अशाप्रकारे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षात झालेल्या विकासाची माहिती दिली.