महादेव जानकर हे परभणीतून लोकसभा निवडणूक लढवणार हे माहिती झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी त्यांच्यासाठी एक खास संदेश दिला. जानकरांना सांगा, मी त्यांची लोकसभेत वाट पाहतोय असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परभणीकरांना दिल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. महादेव जानकरांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी परभणीत हजेरी लावली. त्यावेळी महायुतीच्या नेत्यांनी मोठं शक्तिप्रदर्शन केलं. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमानंतर आम्ही थेट परभणीला महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांचा अर्ज दाखल करण्यासाठी आलो. त्यावेळी परभणीला येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला सांगितले की, 18 लोकसभेत मी जानकर यांचा वाट पाहत आहे. तुमची जबाबदारी आहे, त्यांना निवडून आणायची. मी महादेव जानकरांना तुमच्याकडे पाठवलं आता, तुम्ही त्यांना परभणीचे खासदार बनवून संसदेत पाठवा”, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
महादेवराव जानकर हे मूर्ती लहान पण कीर्ती महान आहेत. माझ्यासोबत पाच वर्ष मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केलं. कूरकूर नाही, कुरबूर नाही. सातत्याने आपल्या खात्याचं काम अतिशय नेटाने करायचं. सामान्य माणसाकरता काम करायचं. अरे पाच वर्षात 1 रुपयांचा डाग देखील या महादेव जानकरांना कुणी लावू शकलं नाही. हा मंत्री फाटकाच आला आणि मंत्रिमंडळ गेल्यानंतरही फाटकाच राहीला, आजही फाटकाच आहे. जन्मभर फाटकाच राहणार आहे, म्हणूनच लोकांच्या मनात त्यांचं घर आहे.असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
जात, धर्म, पंथ न विचारता मोदींनी गरीबांना घरं दिली. पाण्याचं कनेक्शन देताना जात, धर्म विचारला नाही. महादेव जानकरांना मत देणं म्हणजे मोदींना मत देणं आहे हे विसरु नका. मोदींना मत देताना त्यांचं चिन्ह विसरु नका. कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ हे त्यांच्यामागे आहेत. त्यांना चिन्ह मिळालं की आपल्याला निवडून आणायचं आहे. महादेव जानकर हा साधा माणूस आहे त्यामुळे त्यांना निवडून आणा असं आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी परभणीच्या जनतेला केलं.
