लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल

आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या शारीरिक चाचणी कार्यक्रमांमध्ये बदल करण्यात आला आहे. या संदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. या मध्ये नवी मुंबई पोलिस मुख्यालयात होणाऱ्या १५ ते १७ एप्रिल दरम्यान निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणीच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणूकच्या तारखा पाहता १९, २६ आणि २७ एप्रिल रोजी होणाऱ्या शारीरिक चाचणी कार्यक्रमात हा बदल करण्यात आला आहे. आता या तारखांऐवजी २९, ३० आणि २ मे रोजी शारीरिक चाचणी होणार आहे. तर इतर तारखांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचे एमपीएससीच्या वतीने कळविण्यात आले आहे.

याबाबत एमपीएससीकडून जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा-२०२२ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा कार्यक्रम दिनांक १५ ते २७ एप्रिल २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रम निश्चित करताना लोकसभा निवडणूकीतील मतदानाचे टप्पे विचारात घेऊन त्या-त्या टप्प्यातील उमेदवारांना अन्य दिवशी शारीरिक चाचणीसाठी बोलविण्यात आले होते. तथापि भारतीय निवडणूक आयोगाकडील प्राप्त निवेदने विचारात घेता दिनांक १९, २६ व २७ एप्रिल २०२४ रोजीच्या उमेदवारांची शारीरिक चाचणी अनुक्रमे दिनांक २९, ३० एप्रिल २०२४ व २ मे २०२४ या दिवशी पोलीस मुख्यालय नवी मुंबई येथे घेण्यात येणार आहे.

परभणी लोकसभा मतदारसंघासाठी २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने 25 एप्रिल रोजी मतदान केंद्रांवर मतदार प्रतिनिधी जाणार आहेत. यामध्ये प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश असून, या कारणाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठा अंतर्गत असलेल्या अंतिम आणि उन्हाळी सत्राच्या सर्व परीक्षांचे वेळापत्रक बदलण्याची मागणी परभणीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी पत्राद्वारे कुलगुरू यांच्याकडे केली आहे. निवडणूक तात्काळ म्हणुन हे पत्र असल्याने या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे.