जनतेची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं बाबा रामदेव यांना फटकारलं. कोर्टाच्या कारवाईसाठी तयार राहा, तुम्ही इथं येऊन केवळ नावाला माफी मागत आहात, अशा शब्दांत कोर्टानं रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्यावर ताशेरे ओढले. तुमच्या दिलगिरीवर आम्ही अजिबात समाधानी नाही, आमचीच नाही तर संपूर्ण देशाची माफी मागा असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
मंगळवारी रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण हे दोघेही सुप्रीम कोर्टात दाखल झाले. रामदेव बाबांच्या वकिलांनी “आम्ही दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी माफी मागतो. आपल्या आदेशानुसार स्वतः रामदेव बाबा कोर्टात पोहोचले आहेत. या प्रकरणी ते माफी मागत आहेत. कोर्टाने त्यांच्या माफीची नोंद घ्यावी. आम्ही कोर्टापासून पळ काढण्याचा प्रयत्न करत नाही” असे सांगितले.
आम्हाला माफी मान्य नाही, आम्ही अवमानाची कारवाई करू. आपण काय केले आहे याची आपल्याला कल्पना नाही. तुम्ही गंभीर विषयांची खिल्ली उडवली आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने काय परिणाम होतात हे तुम्हाला समजल पाहिजे, असं अशा शब्दात कोर्टाने बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्णन यांना झापलं आहे.
पतंजलीच्या औषधांबाबत रामदेव बाबांनी जारी केलेल्या जाहिरातींमध्ये लोकांची दिशाभूल करणारे दावे केल्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणीसाठी आला होता. अॅलोपथी उपचारांविरोधात अपप्रचार व करोना काळात अॅलोपथी औषधांसंदर्भात केलेल्या विधानांवर न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या रिट याचिकेमध्ये तीव्र आक्षेप घेण्यात आला होता. यानंतर न्यायालयाने १९ मार्च रोजी पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण व बाबा रामदेव यांना २ एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. २१ मार्च रोजी पतंजलीकडून न्यायालयात सादर करण्यात आलेल्या शपथपत्राच्या माध्यमातून पतंजलीने बिनशर्त माफीही सादर केली होती.
सर्वोच्च न्यायालयानं रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना सांगितलं की, तुम्हाला कोर्टात दिलेलं वचन पाळावं लागेल, तुम्ही प्रत्येक मर्यादा मोडली आहे. तर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या प्रकरणाबाबत सांगितलं की, जे घडलं ते व्हायला नको होतं. इंडियन मेडिकल असोसिएशनने रामदेव बाबांच्या पतंजली कंपनीच्या जाहिराती भ्रामक माहिती पसरवत असल्याचा आरोप करत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.
