पीएमपीचालकांना अडथळा होईल, अशा प्रकारे रिक्षा चालविणाऱ्या आणि बसस्थानक, थांब्याच्या परिसरात येऊन बस प्रवासांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या तीन महिन्यांत नियम मोडणाऱ्या एक हजार ६२० बेशिस्त रिक्षाचालकांवर पीएमपी आणि प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) संयुक्त कारवाई केली आहे. याशिवाय स्वारगेट पोलिसांकडून रिक्षांबरोबरच ओला, उबेर, खासगी प्रवासी अशा एकूण ५३९ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून तीन लाख ३२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पीएमपीची बसस्थानके किंवा बसथांब्यांपासून ५० मीटर अंतरावर रिक्षाचालकांना रिक्षा थांबवता येत नाही, असा नियम आहे. परंतु रिक्षाचालक त्या नियमाकडे दुर्लक्ष करून सर्रास पीएमपीच्या मुख्य बसस्थानकांच्या परिसरात येवून बसप्रवाशांची वाहतूक करतात. तसेच बसचालकांना अडथळा होईल अशा प्रकारे रिक्षा उभ्या करतात, अशा तक्रारी पीएमपीचे चालक, प्रवासी आणि प्रवासी मंच या संघटनेकडून प्रशानाकडे सातत्याने करण्यात आल्या होत्या.
त्याची दखल घेऊन पीएमपी आणि आरटीओ अधिकारी यांची दोन पथके तयार करण्यात आली आहेत. त्यात पीएमपीचे चार कर्मचारी आणि एक आरटीओ अधिकारी यांचा समावेश आहे. त्यांनी गेल्या ३ महिन्यांत पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील पीएमपीएमएलच्या मुख्य बसस्थानकांच्या ५० मीटरच्या परिसरात येवून नियम मोडणाऱ्या एकूण १,६२० रिक्षाचालकांवर कारवाई केली आहे, अशी माहिती पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय कोलते यांनी दिली.
रिक्षा चालक हे पीएमपीच्या स्थानकांच्या परिसरात येऊन रिक्षा उभी करत असतात. तर बसचालकांना अडथळा होईल, या प्रकारे रिक्षा चालवतात. त्यामुळे या रिक्षा चलकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रवासी आणि प्रवासी संस्था, संघटनांनी पीएमपी प्रशासनाकडे आणि आरटीओकडे सातत्याने केली होती.अखेर या मागणीची दखल घेऊन गेल्या तीन महिन्यांपासून बेशीस्त रिक्षा चालकांविरोधात कारवाई करण्यास पीएमपी आणि आरटीओने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या साठी वाहतूक विभागाकडील पर्यवेक्षकीय सेवकांचे पथक तयार करण्यात आले आहे. तर या पथकासोबत पीएमपीकडील चार सेवक आणि एक आरटीओ अधिकारी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासाठी नेमण्यात आले आहेत.
