“खासदार साहेब पाच वर्ष कुठं होता?” शिरुरमध्ये अमोल कोल्हेंविरोधात बॅनर

शिरूर लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत होणार आहे. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पुन्हा एकदा खासदारकीची निवडणूक लढवत आहेत तर आढळराव पाटील हे अजित पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोन्ही राष्ट्रवादीमध्येच शिरूरची लढत होणार असल्याचे संपूर्ण महाराष्ट्र्राचे लक्ष्य या मतदासंघात आहेत. दोन्ही नेत्यांकडून आपापल्या प्रचाराला सुरुवात पण करण्यात आली आहे. त्याच दरम्यान, शिरूर मध्ये विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात बॅनरबाजी करत काही प्रश्न अमोल कोल्हे यांना विचारण्यात आले आहेत.

अमोल कोल्हे हे आंबेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर असताना गंगापुर फाट्यावर एका सुज्ञ मतदाराने एक फलक लावत अमोल कोल्हे यांना काही प्रश्न विचारले आहे. हा बॅनर सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. खासदार साहेब उत्तर द्या, असे आव्हान करण्यात आले आहे.

शिरुर मतदार संघात अमोल कोल्हे यांनी दौरा केला. यावेळी परिसरात अमोल कोल्हे यांच्या विरोधात बोलके पोस्टर लागलेले पाहायला मिळाले. त्यात विद्यमान खासदार साहेब पाच वर्षे तुम्ही कुठे होता? कोरोनासारख्या भयंकर परिस्थितीमध्ये तुम्ही मतदारसंघांमध्ये का नव्हता? पाच वर्षे मतदारसंघात नाही पण प्रचारासाठी तुम्हाला वेळ कसा मिळाला? असे तीन प्रश्न बॅनरद्वारे विचारण्यात आले आहेत.

या दौऱ्यादरम्यान अमोल कोल्हे यांनी मात्र या बॅनरवर उत्तर दिले नाही . यावरून अमोल कोल्हे खरंच मतदारसंघात आले होते की नाही? नागरिकांशी त्यांनी संपर्क ठेवला की नाही हा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. त्यामुळे हा बॅनर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

2019 मधील लोकसभा निवडणुकीत आढळराव पाटील यांना 5 लाख 77 हजार 347 मते मिळाली होती. तर अमोल कोल्हेंना 6 लाख 35 हजार 830 मते मिळाली होती. या निवडणुकीत अमोल कोल्हेंनी जवळपास 58 हजार 483 मतांची आघाडी घेत आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. यानंतर आता पुन्हा या दोन्ही आजी माजी खासदारांत लढत होणार आहे.