सांगलीच्या जागेचा तिढा वाढला,काँग्रेसच्या कोणत्याही बैठकीला उपस्थित राहणार नाही, काँग्रेस आमदार विश्वजीत कदम आक्रमक

महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता असून त्याला सांगलीच्या जागेचा वाद कारणीभूत ठरणार असं दिसतंय. सांगलीची जागा ही काँग्रेसलाच मिळावी आणि त्यासाठी टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी चालेल असं या आधी सांगणाऱ्या आमदार विश्वजीत कदम यांनी आता आक्रमक भूमिका घेतल्याचंदिसतंय. जोपर्यंत सांगलीचा तिढा सुटत नाही तोपर्यंत आपण काँग्रेसच्या कोणत्याही बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचं विश्वजित कदम यांनी स्पष्ट केलंय.

काँग्रेसची प्रचार समिती निवडीची बैठक आज (३ एप्रील) बुधवारी होणार आहे. त्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी विश्वजीत कदमांना पक्षश्रेष्ठींचे पत्र मिळाले आहे. मात्र महाविकास आघाडीत सांगलीचा उमेदवार ठरवताना जिल्हा काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून विश्वासात घेतले नाही. तसेच सांगलीच्या जागेचा तिढ्यावर आघाडीकडून स्पष्ट माहिती मिळत नाही. त्यामुळे प्रचार समिती निवडीच्या बैठकीला उपस्थित राहणार नाही, अशा शब्दांत कदमांनी नानाभाऊंना आपला पवित्रा दाखवून दिला आहे.

“नाना गावंडे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांचे दिनांक ३० मार्च रोजीचे काँग्रेस राज्य प्रचार समितीच्या निवडीचे व बैठकीचे पत्र मला मिळाले. आपण माझी प्रचार समितीच्या सदस्यपदी निवड केली त्याबद्दल मी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेजी, महाराष्ट्र राज्याचे प्रभारी रमेश चेनिथलाजी आणि आपला मनापासून आभारी आहे. राज्यात आगामी लोकसभा निवडणूक ही काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी म्हणून आपण सर्वजण ताकदीने लढवणारच आहोत. माझी आणि सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांची सांगली लोकसभेच्या जागेबाबतीत असणारी भावना आपण जाणत आहात”, असं विश्वजीत कदम पत्रात म्हणाले आहेत.

दरम्यान, कदमांनी सांगलीची जागा काँग्रेसकडे राखण्यासाठी दिल्ली वाऱ्या केल्या आहेत. ही जागा काँग्रेसकडेच राहण्यासाठी त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीच्या धामधुमीत कदमांनी आक्रमक बाणा दाखवल्याने आघाडीत गोंधळ उडला आहे. कदमांच्या या पत्रामुळे, काँग्रेस, महाविकास आघडीत राजकीय नाराजी नाट्याचा नवा प्रयोग लोकांपुढे आला आहे.