पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची १० एप्रिलला रामटेकला सभा

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यामध्ये रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली -चिमूर आणि चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघातील पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होणार असून यातील रामटेक आणि चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभा घेणार आहेत. यातील पहिली सभा ही 10 एप्रिल रोजी रामटेक तर दुसरी सभा ही १४ एप्रिल रोजी चंद्रपूर मध्ये होणार आहे.तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ५ किंवा ६ एप्रिल रोजी विदर्भात सभा होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची आखणी करण्यासाठी भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर “आज महाराष्ट्राच्या व्यवस्थापन समितीची बैठक प्रभारी डॉ. दिनेश शर्मा यांच्या उपस्थितीत पार पडली. महाराष्ट्रात निवडणुकीच्या दृष्टीने व्यूहरचना काय आहे, कशा प्रकारची व्यवस्था, यंत्रणा उभी आहे. या यंत्रणेची अंमलबजावणी नेमकी कशा पद्धतीने होते आहे. याचा आढावा आणि मार्गदर्शक सूचना डॉ. दिनेश शर्मा यांच्या माध्यमातून देण्यात आल्या. व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून प्रत्येकावर जबाबदारी देण्यात आली आहे”, असे प्रवीण दरेकर म्हणाले.

निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेकजण इच्छुक असतात. काही जण उमेदवारी मिळाली नाही तरी पक्षाच्या विचाराशी एकनिष्ठ राहून काम करतात आणि एखाद्याला निवडणूकच लढवायची असेल तर इतर पक्षात जाण्याची भूमिका अनेक लोकं अनेक पक्षात घेताना दिसतात. तशी भूमिका उन्मेष पाटील यांची आहे का? हे लवकरच समजेल. ठाकरेंना दुस-यांनी टाकलेलेच उचलावे लागणार आहे. स्वत:कडे उमेदवार नाहीत. जे चांगले उमेदवार होते ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. उबाठा सेनेच्या उमेदवारांवर नजर टाकली तर सर्व उमेदवार आयात करून निवडणुका लढवत आहेत. रिकाम्या जागा भरण्याचा उबाठा सेनेचा प्रयत्न असल्याची बोचरी टिका प्रविण दरेकरांनी केली.

नागपूर, रामटेक, गडचिरोली, भंडारा-गोंदिया व चंद्रपूर या मतदारसंघात १९ एप्रिलला मतदान होणार आहे. पाचपैकी तीन ठिकाणी भाजपचे विद्यमान खासदार आहेत. ‘मिशन-४५’ अभियानानुसार महायुतीने विशेषत: भाजपने या सर्व जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. प्रचारासाठी पक्षाचे दिग्गज नेते येणार आहेत.