भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. अर्चना पाटील यांचा आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर उपस्थित होत्या. अर्चना पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांना धाराशिव लोकसभा मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. सुनील तटकरे यांनी आज पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली.
धाराशिवची जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात असल्यानं आता राष्ट्रवादीकडून अर्चना पाटील मैदानात उतरल्या आहेत. ही जागा राणा जगजितसिंह पाटील यांनी लढवावी, असा प्रस्ताव यापूर्वीच अजित पवार यांनी दिला होता.मात्र, सध्या भाजपात असणाऱ्या राणा पाटील यांनी यासाठी साफ नकार दिला आहे.
२०१९ साली शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर याठिकाणाहून निवडून आले होते. ओमराजे निंबाळकर सध्या ठाकरे गटाबरोबर आहेत. त्यामुळे शिवसेना शिंदे गटानेही या मतदारसंघावर दावा केला होता. अखेर चर्चेतून राष्ट्रवादीला धाराशिव मतदारसंघ मिळाला. मात्र त्यानंतर उमेदवार ठरविण्याचा प्रश्न होता. त्यातून ओमराजे निंबाळकर यांना टक्कर देण्यासाठी पाटील कुटुंबातून उमेदवार देण्यासाठी अर्चना पाटील यांच्या नावाची घोषणा झाली. याआधी पद्मसिंह पाटील या मतदारसंघातून निवडणूक लढवत असत.
अर्चना पाटील यांनी याआधी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या उपसभापती म्हणून काम केले आहे. सध्या त्यांच्याकडे कोणतेही पद नसले तरी त्या सामाजिक कामातून लोकांच्या संपर्कात असतात. लेडीज क्लबच्या माध्यमातून त्या धाराशिव जिल्ह्यात महिलांसाठी काम करत असतात.जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी स्वतःला झोकून देऊन काम केले.जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्राथमिक उपकेंद्राचे जिल्हाभरात जाळे निर्माण केले.अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या यांचे मानधन वाढीसाठी विशेष प्रयत्न प्रलंबित प्रश्न मार्गी लावला.
