देशभरात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. त्यामुळे देशातील सर्वच राजकीय पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप करायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात तर आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी नेत्यांमध्ये स्पर्धाच लागल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक नेते पत्रकार परिषदेतून तर काही नेते सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांवर टीका करताना दिसत आहेत. अशातच आता मुंबई भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर ट्विटरच्या माध्यमातून बोचरी टीका केली आहे. शेलारांच्या या टीकेमुळे भाजप आणि शिवसेना ठाकरे गट पुन्हा एकदा आमने-सामने येण्याची दाट शक्यता आहे.शेलारांनी यावेळी कवितेच्या माध्यमातून ठाकरेंवर बाण सोडला आहे.
राज्यात 2019मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सर्वच राजकीय समीकरणे बदलली. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने सत्ता स्थापन केली. त्यामुळे भाजपा आणि शिवसेनेत मोठी दरी निर्माण झाली. आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विरोधकांच्या इंडियात सहभागी झाले आहे. हाच संदर्भ घेत आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
आशिष शेलार यांनी ट्विटरवर कवी कुसुमाग्रजांच्या ‘फक्त लढ म्हणा’ या कवितेचे विडंबन करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यांनी लिहिले आहे, ओळखलंत का राहुलजी मला? मुंबईतून आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी. क्षणभर बसले, नंतर हसले बोलले वरती पाहून काँग्रेसशी मैत्री केली, राम मंदिरावर अहंकारी टीका केली, गेला अख्खा पक्षच मला सोडून.
आशिष शेलारांनी ‘म्हणा’ या शीर्षकाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक कविता शेअर केली आहे.
म्हणा!!
ओळखलत का राहुलजी मला? मुंबईतून आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसले, नंतर हसले बोलले वरती पाहून
काँग्रेसशी मैत्री केली,
राम मंदिरावर अहंकारी टीका केली
गेला अख्खा पक्षच मला सोडून…
नेते गेले,चिन्ह गेले, नगरसेवक, शाखाप्रमुख पण गेले
दोन मुलगे आणि दोन मातोश्री तेवढेच पदरी वाचले
बोलक्या, संजयला घेउन, राहुलजी, आता लोकसभा लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे,
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठले
खोके नको राहुलजी,
जरा एकटे एकटे वाटले
जमले तर…
सभेला चार कार्यकर्ते तेवढे पाठवा
दोन – चार जागा देऊन आमची इज्जत तेवढी वाचवा!
मोडला जरी पक्षाचा संसार
मोडला जरी गटाचा कणा
तुम्ही इज्जत देऊन
“पक्षप्रमुख” तेवढं म्हणा!
( कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांची क्षमा मागून)
