काँग्रेस पक्षातून संजय निरुपम यांची हकालपट्टी, पक्षविरोधी वक्तव्यं केल्याने कारवाई

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षाविरोधात उघडपणे भूमिका घेणारे माजी खासदार संजय निरुपम यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी दुपारीच संजय निरुपम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आता संजय निरुपम यांना पक्षातून निष्कासित करण्यात आले आहे. संजय निरुपम यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमांडने दिल्लीतून संजय निरुपम यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचे आदेश काढले. यावर आता संजय निरुपम काय प्रतिक्रिया देणार, याकडे लक्ष लागले आहे.

पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत अखिल भारतीय काँग्रेस समितीने मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. सहा वर्षांसाठी ही कारवाई असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. तसेच प्रदेश काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून त्यांचे नावही काढून टाकण्यात आले आहे.

काँग्रेसचेराष्ट्रीय सचिव के. सी वेणुगोपाल यांच्या सहीने पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामध्ये लिहिले आहे की,पक्षाची शिस्तभंग आणि पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्षांनी संजय निरुपम यांना तातडीनं ६ वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्याला मान्यता दिली आहे. बुधवारी दुपारीचप्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निरुपम यांच्यावरील कारवाईचे संकेत दिले होते.त्यापूर्वी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून संजय निरुपम यांचंनाव हटवल्याने त्यांच्यावर पक्षातून हकालपट्टीची कारवाई कधीही होऊ शकते, अशी शक्यता होती. त्यानुसार अखेर ही कारवाई करण्यात आली आहे.

संजय निरुपम यांनी मुंबईतील उत्तर पश्चिम या जागेवर दावा केला होता. मात्र या जागेवर चर्चा सुरू असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने अमोल किर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर संजय निरुपम यांनी मी खिचडी चोराचा प्रचार करणार नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर संजय निरुपम यांनी अशोक चव्हाण यांची भेटही घेतली होती. मात्र ही भेट वैयक्तिक असल्याचे संजय निरुपम यांनी सांगितले होते.