मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. ‘नगर जिल्ह्याचे वाटोळे शरद पवार यांनी केले. नगर जिल्ह्यात विकासात्मक काम करण्यासाठी धडपडत असलेल्या विखे परिवाराला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न शरद पवार यांच्याकडून वारंवार होत आला आहे.’, असा गंभीर आरोप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी महायुतीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री विखे यांनी थेट शरद पवार यांच्यावरच हल्ला चढवला.
नगर जिल्ह्यात गरीब- विरूद्ध श्रीमंत असा निवडणुकीचा मुद्दा कधीच उपस्थित झाला नव्हता. महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडीला उमेदवार मिळत नव्हता. त्यामुळे शरद पवार यांनी आयात केलेला उमेदवार लादला आहे. आता त्यांच्यामार्फत जिल्ह्यात नकारात्मक राजकारण खेळले जात आहे. नगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण अस्थिर ठेवायचे, सतत नेत्यांमध्ये भांडणे लावायची हेच प्रकार शरद पवारांकडून केले जातात. त्यांनी जिल्ह्यासाठी कधीही नवीन योजना आणल्या नाहीत. विकासाचे मुद्दे मांडले नाहीत. राज्यात आणि केंद्रात सत्ता पदांवर असतानाही त्यांना जिल्ह्याचे भले करता आलेले नाही. आता आम्ही ते काम सुरू केले आहे, तर त्यात नकारात्मक राजकारण करून खोडा घातला जात आहे. त्यामुळे आमचा संघर्ष या लादलेला उमेदवाराविरूद्ध नव्हे तर थेट शरद पवार यांच्या या भूमिकेविरूद्धच राहणार आहे,’ असेही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
आठ महिन्यापूर्वी अजित पवारांसोबत गेलेला उमेदवार अजित पवारांना सोडू शकतो तर तो जनतेला सोडू शकतो, असं म्हणत या जिल्ह्याच्या सर्वात जास्त वाटोळ कोणी केला असेल तर ते शरद पवारांनी असं विखे पाटलांनी म्हटले आहे.सुपा एमआयडीसीच्या मुद्द्यावरून मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी निलेश लंके यांच्यावर निशाणा साधला आहे. एमआयडीसी काही लोकांनी ठेकेदारीसाठी वापरली. तर हे सगळे ठेकेदार आहेत त्यांचा बंदोबस्त करावाच लागेल, असा इशाराच मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिला आहे.
