राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या सभेचा ट्रेलर लाँन्च; एका मिनिटांच्या व्हिडिओमध्ये मनसैनिकांना घातली साद

राज ठाकरेंनी गुडीपाडव्याच्या सभेनिमित्त मनसैनिकांना साद घातली आहे. मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचे आहे, असे म्हणत राज ठाकरेंनी गुडीपाडव्याच्या सभेत नेमके काय घडत आहे? सर्व सांगणार असल्याचे टिझर रिलीज करत जाहीर केले आहे. एका मिनिटांच्या व्हिडिओमध्ये राज ठाकरेंनी मनसैनिकांना साद घातल्याचं दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी दिल्लीवारी केली, तेव्हापासूनच मनसे महायुतीत सामील होणार या चर्चांना उधाण आलं होतं. पण नेमकं घडतंय काय? हा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात आहे. अशातच राज ठाकरेंनी आता मनसैनिकांना साद घातली आहे. मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचंय, असं म्हणत राज ठाकरेंनी गुडीपाडव्याच्या सभेत नेमकं काय घडतंय? सर्व सांगणार असल्याचं जाहीर केलं आहे.

“9 तारखेला शिवतीर्थावर या, नक्की काय घडलंय, काय घडतंय… हे मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचं आहे!”, अशा कॅप्शनसह राज ठाकरेंनी गुडीपाडवा मेळाव्याचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. त्यामुळे गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकं काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे. मंगळवार 9 एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजता दादरमधील शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा महत्त्वाचा मानला जातो.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राज ठाकरे यांच्या मेळाव्यात ते नेमकं कुणाला टार्गेट करणार, कोणता नवीन मुद्दा मांडणार याबाबत सर्वच उत्सुक आहेत. मध्यंतरी त्यांनी दिल्लीत पुत्र अमित ठाकरे यांच्यासोबत भाजपाचे नेते अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे मनसे आणि भाजपा युतीच्या चर्चा रंगल्या होत्या.

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे कोणती घोषणा करणार, याकडे लक्ष लागून राहिलं आहे. एक म्हणजे, गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राज हे मनसे महायुतीत सहभागी होत असल्याचं जाहीर करु शकतात. त्यानुसार आगामी टप्प्यातील निवडणुकांच्या प्रचारात मनसैनिक महायुतीच्या मदतीला लागतील. दुसरी शक्यता म्हणजे मनसे महायुतीत सहभागी न होता स्वबळावर लढण्याची घोषणा होऊ शकते.