सांगलीतलं जनावरसुद्धा सांगेल, सांगलीची जागा काँग्रेसचीच…विश्वजीत कदमांचा संजय राऊतांवर थेट हल्लाबोल

सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात जुंपली आहे. शिवसेना ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली असून प्रचारालासुद्धा सुरुवात झालीय. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस मात्र ही जागा आमचीच असून लढवण्यासाठी आग्रही असल्याची भूमिका मांडत आहे. यामुळे मविआमधली सांगलीच्या जागेवरून सुरू असलेली धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे.

काँग्रेसला सव्वाशे वर्षांचा इतिहास आहे. स्वातंत्र्यलढ्यात हा पक्ष लढला. देशाच्या गावागावांत हा पक्ष आहे. सांगली जिल्ह्याच्या घराघरात काँग्रेस आहे. सांगलीबाबत कोणी आम्हाला इशारा देऊ नका, अशा शब्दांत आमदार विश्वजीत कदम यांनी आज शिवसेना नेते खासदार संजय राऊतयांच्यावर प्रतिहल्ला चढवला. संजय राऊत काय बोलतात, यावर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही. सांगलीच्या समाजकारण आणि राजकारणाचा इतिहास आणि भूगोल ज्याला माहित असणाऱ्या कुठलाही व्यक्तीला किंवा सांगलीच्या एखाद्या जनावराला सुद्धा विचारलं तर तो सांगेल की सांगली काँग्रेस विचारधारेचा जिल्हा आहे. सांगलीची जागा काँग्रेसची असल्याचं म्हणत विश्वजीत कदम यांनी संजय राऊतांवर थेट हल्लाबोल केला.

काँग्रेसला इशारा देण्याची गरज नाही. काँग्रेस सव्वाशे वर्षांचा राष्ट्रीय पक्ष आहे. आज माझ्यासोबत विशाल पाटील आहेत. काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढण्यासाठी आम्ही इच्छुक आहे आणि हीच भावना महाराष्ट्र आणि देशाच्या नेतृत्वाकडे सांगितली. राज्यात काम करत असलो तरी सध्या फक्त सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचा आमदार म्हणून मी इथं आल्याचं विश्वजीत कदम म्हणाले.

विश्वजित कदम म्हणाले की, सांगलीत गेले दोन निवडणुकीत भाजप खासदार निवडून आला आहे. त्यामुळे बदल घडावा म्हणून विशाल पाटील यांच्या रुपाने सक्षम उमेदवार आम्ही दिला आहे. आम्हाला कुणीही इशारा देऊ नये. काँग्रेस महाराष्ट्रात मजबूत पक्ष आहे. सांगलीच्या घराघरात काँग्रेसची विचारधारा आहे. त्यामुळे इतर कुणी सांगलीबाबत वक्तव्य कुणी करु नयेत, असा टोला त्यांनी ठाकरे गटाला लगावला.