सांगली लोकसभा मतदारसंघावरुन शिवसेना आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीमध्ये वाद वाढला आहे. शिवसेना ठाकरे गटाने सांगलीत पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्याचवेळी काँग्रेस ही जागा सोडण्यास तयार नाही. काँग्रेसच ही जागा लढवणार असल्याचे विशाल पाटील यांनी म्हटले आहे. त्यासाठी विश्वजित कदम, विशाल पाटील हे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेले होते. विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी मल्लिकार्जुन खरगे आणि के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेत सांगलीच्या जागेबाबत चर्चा केली.
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर आता सांगलीतील काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी सांगलीतील जनतेला पत्र लिहिलं आहे. ‘सांगली काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार, असा दावा देखील विशाल पाटील यांनी पत्रातून केला आहे.
काँग्रेसने जिल्ह्यात विकासरुपी गंगेच्या माध्यमातून सांगलीचा चेहरा मोहरा बदलला आहे. सांगलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपल्याला काँग्रेसचा हा गड मोठ्या ताकदीने केवळ लढवायचा नाही, तर जिंकायचा देखील आहे. आपण लढू आणि जिंकू असा विश्वास या पत्रात विशाल पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच सांगलीच्या जागेसाठी विश्वजीत कदम हे सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. एकीकडे विश्वजीत कदम हे प्रयत्न करीत आहेत असे म्हटले जाते. तर दुसरीकडे विशाल पाटील हे जयंत पाटील यांचे नाव देखील घेत नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीमधील दरी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
विशाल पाटील यांनी सांगलीच्या जनतेला लिहिलेलं पत्र
मागच्या काही वर्षात सांगली काँग्रेसचा अनेक आघाड्यांवर संघर्ष सुरू आहे. सांगलीकरांच्या विकासासाठी आपण सत्ताधाऱ्यांविरुद्ध सातत्याने संघर्ष करत आहेत. काँग्रेसनेच जिल्ह्यात विकासरुपी गंगेच्या माध्यमातून सांगलीचा चेहरामोहरा बदलून टाकला. त्यामुळे सांगली काँग्रेसची आणि काँग्रेस सांगलीची असं समीकरणच तयार झालं आहे.वसंतदादा पाटील, पतंगराव कदम साहेब, गुलाबराव पाटील साहेब, प्रकाशबापू पाटील, मदनभाऊ पाटील, आर आर पाटील, शिवाजीराव देशमुख अशा अनेक दिग्गज नेत्यांनी सांगलीच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली हे तुम्हाला ठावूकच आहे. त्यामुळे काँग्रेस आणि सांगलीचं अतुट नात तयार झालं आहे.
या आधीच्या काळात तुम्ही सर्व जण पक्षाच्या आणि माझ्या पाठीमागे खंबीरपणे आहात याबद्दल मी तुम्हा सर्वांचा अत्यंत आभारी आहे. तुमची खंबीर साथ अशीच सोबत राहो. आपणा सर्वांना विश्वास आहे की, सांगली काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार आहे. तुम्ही सर्वांनी सांगलीच्या प्रगतीसाठी आतापर्यंत दाखवलेला संयम असाच आणखी काही दिवस ठेवा. सांगली लोकसभेच्या उमेदवारीबाबत नक्कीच चांगली बातमी येईल याची मला खात्री असल्याचे विशाल पाटील म्हणाले. आपल्याला काँग्रेसचा हा गड मोठ्या ताकदीने केवळ लढवायचा नाही, तर जिंकायचा आहे. आपण लढू आणि जिंकू असं पोस्टमध्ये विशाल पाटलांनी म्हटलंय.

