महाराष्ट्र काँग्रेसमधील नेत्यांमध्ये निर्णयक्षमता नाही – खासदार अशोक चव्हाण

राज्यातील सत्ताधाऱ्यांची महायुती आणि विरोधकांच्या महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा कायम आहे. पण, महाविकास आघाडीत सुरू असलेल्या जागावाटपाच्या पेचाला अशोक चव्हाण जबाबदार असल्याचा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी खासगीत बोलताना केला आहे. जागावाटपाच्या चर्चेत अशोक चव्हाणांची भूमिका महत्त्वाची होती. त्यामुळे पारंपरिक मतदारसंघाऐवजी अन्य मतदारसंघांवर दावा करण्यात आला. त्यामुळे भाजपत प्रवेश करण्यापूर्वी जाणीवपूर्वक हा घोळ चव्हाणांनी केला का? असा संशय काँग्रेस नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला असलेल्या सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हे आता महाआघाडीच्या चर्चेतील कळीचा मुद्दा ठरत आहेत. हे मतदारसंघ देताना काँग्रेसने अधिकचे लक्ष दिले नाही. त्यावेळी वाटाघाटीची जबाबदारी ही अशोक चव्हाण यांच्याकडे होती. मात्र, अशोक चव्हाण यांनी जाणीवपूर्वक या जागांकडे लक्ष दिले नसल्याचा आरोप आता काँग्रेसचे नेते करत आहेत. तर दुसरीकडे रामटेक, कोल्हापूर आणि अमरावती मतदारसंघावर उद्धव ठाकरे गटाचा दावा होता. मात्र या मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवार दिल्यामुळे इतर तीन मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यातून निघाले असल्याचा दावा महाआघाडीतील इतरघटक पक्ष करत आहेत.

काँग्रेस नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांवर माध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये काँग्रेसला आलेले अपयश आणि भविष्यात होणारा पराभव या सर्वांचे खापर अशोक चव्हाणांवर फोडण्याचा उद्योग सध्याचे काँग्रेस नेते करत आहेत. ही अत्यंत हास्यास्पद बाब आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेतृत्वाने त्यांची धूळधाण केली आहे. काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जाण्याची हिंमत त्यांच्यात नाही. तसेच पक्षश्रेष्ठींना उत्तरही त्यांना देता येत नाही. त्यामुळे काँग्रेस नेत्यांकडून माझ्यावर केले जाणारे आरोप म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे, असा प्रकार असल्याची टीका यावेळी अशोक चव्हाण यांनी केली.

अशोक चव्हाण म्हणाले, महाराष्ट्र काँग्रेसमधील नेत्यांमध्ये निर्णयक्षमता नाही. परंतु, कोणाबद्दल तरी बोलायला हवं म्हणून ते माझं नाव घेतायत. त्यांच्या मते अशोक चव्हाण सॉफ्ट टार्गेट आहे. अशोक चव्हाणांना आपण काहीही बोलू शकतो, त्यांना बोलल्यावर कोणाला काही फरक पडणार नाही. अशोक चव्हाणांवर टीका करणं सोयीचं आहे.प्रसारमाध्यमांवर सध्या ज्या काही बातम्या पाहायला मिळत आहेत, त्या पाहून असं वाटतंय की, जागावाटपात काँग्रेसला मोठं अपयश मिळालं आहे. या अपयशाचं लोकसभा निवडणुकीतल्या पराभवात रुपांतर होणार आहे.