कल्याणमधून श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार, उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीसांकडून थेट घोषणा

गेल्या काही महिन्यांपासून कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून मोठी चर्चा पाहायला मिळत होती. या मतदारसंघातून सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार आहेत. मात्र, यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीला भारतीय जनता पक्षाच्याच स्थानिक पदाधिकारी व नेत्यांकडून तीव्र विरोध करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी महायुतीकडून नेमका ककाय निर्णय होणार? यावर तर्क-वितर्कांना उधाण आलेलं असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण मधील महायुतीचा उमेदवार जाहीर केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची थेट घोषणा केली. यामुळे आता कल्याणमध्ये दुहेरी लढत होणार आहे. ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर राणे आणि महायुतीचे श्रीकांत शिंदे यांच्यात लढत होणार आहे.

श्रीकांत शिंदे यांना भारतीय जनता पक्षाकडून विरोध नाही. श्रीकांत शिंदे हे कल्याणमधून महायुतीचे उमेदवार असणार आहेत. भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहणार आहे. आम्ही पूर्ण ताकदीने त्यांचा प्रचार करणार आहोत. मागच्या निवडणुकीपेक्षाही अधिक मताधिक्याने त्यांचा विजय होईल. आम्ही महायुतीतील भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, रासपा, रिपाई असे सर्व घटकपक्ष त्यांना निवडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान श्रीकांत शिंदे हे कल्याणचे खासदार आहेत. शिवसेनेकडून जी यादी जाहीर झाली त्या यादीमध्ये श्रीकांत शिंदे यांचं नाव असेल अशी अपेक्षा होती. मात्र यादीत नाव नसल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. शिवसेना ठाकरे गटाकडून याच मुद्द्यावरून शिवसेनेवर निशाणा साधण्यात आला होता. राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. मात्र आता देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करून या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.