राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा अजेंडा घेतल्याने जवळीक वाढली; मनसे महायुतीला साथ देईल अशी अपेक्षा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहेत. यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेटही घेतली होती. मात्र, त्यानंतर पुढे काय झाले? चर्चा नेमके कुठे अडली? अमित शाहांबरोबरच्या भेटीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली? याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. यातच आता ९ एप्रिल रोजी मनसेचा मुंबईत पाडवा मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून राज ठाकरे महायुतीच्या सहभागाबद्दल आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. पण या मेळाव्याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केले आहे.

राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा अजेंडा घेतल्याने जवळीक वाढली. मोदींना पंतप्रधान करण्याची भूमिका राज ठाकरेंनी घेतली होती. राज ठाकरेंनी मोदींना पाठींबा द्यावा ही अपेक्षा असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे. मोदींजीच्या सभेने भाजपच्या विजयाची अनुकूलता मोठ्या विजयामध्ये परिवर्तित होईल, यामध्ये शंका नाही. पंतप्रधानांच्या दोन सभेमुळे विदर्भाला भाग ढवळून निघेल. राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा अजेंडा घेतल्याने जवळीक वाढली. ते पंतप्रधान मोदींना पाठिंबा देतील, ही अपेक्षा आहे.

माझा शरद पवारांना सवाल आहे. शरद पवार बारामतीत उमेवदवार नाहीत. सुनेत्रा पवार निवडून आल्या तर मोदींसाठी हात उंचावतील आणि सुप्रिया सुळे निवडून आल्या तर राहुल गांधींसाठी हात उंचावतील. सुनेत्रा ताईंना मतं मिळाली तर ती मोदींना पडतील, सुप्रीया ताईंना मतं मिळाली तर ती राहुल गाधींना पडतील. इतक्या स्पष्ट शब्दात मी सर्वांना समजून सांगितले आहे. मात्र, तरी देखील काही लोकांना समजून घ्यायचेच नाही. आणि ज्यांनी समजून घ्यायचेच नाही असे ठरवले आहे, त्यांच्याबद्दल मी काहीही बोलू शकत नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून पक्षात कोणी प्रवेश करत असेल तर त्याचे आम्ही स्वागतच करू. या संदर्भात पक्षाने अद्याप आम्हाला माहिती दिलेली नाही. मात्र, पक्षाने या संदर्भात आम्हाला माहिती दिली तर त्यांचे देखील आम्ही स्वागतच करू.