संजय राऊतांनी सांगलीत यायचं कारण काय?; जागावाटपाचा तिढा अनपेक्षितपणे समोर – विशाल पाटील

सांगली लोकसभा मतदारसंघातून लढण्याबाबत आम्ही ठाम आहोत. याबाबत कदाचित गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घोषणा होऊ शकते. एवढे दिवस थांबला आहात. उद्यापर्यंत वाट बघा. पण सांगलीमधून काँग्रेसच लढणार असे म्हणत इच्छुक उमेदवार आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी खासदार संजय राऊत यांना ठणकावले.

पत्रकार परिषदेत बोलताना विशाल पाटील म्हणाले, काँग्रेसमध्ये सर्वांनी निर्णय घेतला होता की विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करायचं आणि उमेदवारी पक्षाच्या बाजूनं घ्यायची. त्याची खात्री आम्ही कदम यांना दिली होती. सर्वांच्या मताचा विचार करुन माझ्या नावाचा निर्णय झाला. पण जागा वाटपाचा तिढा अनपेक्षितपणे निर्माण झाला आहे. तरी देखील यावरुन वाद घालण्यापेक्षा आम्ही आमची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

“सांगलीबाबत निर्णय व्हायच्या आधी सांगलीत यायचं कारण काय? देशात निवडणूक जाहीर झालेली असताना संजय राऊतांनी २-३ दिवस इथे येऊन का वाया घालवावेत हा आमच्यासमोरचा प्रश्न आहे. कदाचित या काळात त्यांना अंदाज आला असेल की सांगलीत परिस्थिती नेमकी काय आहे. त्यामुळे त्यांच्या हट्टात बदल झाला असेल अशी मी अपेक्षा करतो”, अशी खोचक टिप्पणीही विशाल पाटील यांनी केली.

मागच्या काही दिवसांपासून सांगलीच्या जागेवरून ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेवर संजय विशाल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत पुरोगामी चळवळीचा आवाज आहे. मात्र राऊत याचा हा आवाज सांगलीच्या विरोधात जातोय. विश्वजीत कदम यांच्यावर संशयास्पद बोलणं चुकीचं होतं, आपल्याच मविआमधील नेत्यांवर संजय राऊत यांनी बोलने हे दुर्दैवी आहे. सांगलीचा विषय हा बंद खोलीत चालला पाहिजे होता. पण तसं झालं नाही. राऊत यांनी संगलीचा दौरा केल्यावर त्यांना जिल्ह्यातील परिस्थिती कळली असेल. त्यामुळे उद्या मुहूर्तावर उमेदवारी जाहीर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सांगलीची जागा कोणाची याबाबत उद्या निकाल लागेल. उद्या चांगला निर्णय होईल. आपल्याला गुढी उभारायची आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उमेदवारी जाहीर होईल. तिकिट मागायला आम्ही कुठेही जाणार नाही. याची संपूर्ण जबाबदारी विश्वजीत कदम यांनी त्यांच्या खांद्यावर घेतली आहे. ते अपयशी ठरणार नाहीत, असा विश्वास देखील यावेळी विशाल पाटील यांनी व्यक्त केला.