काँग्रेसला पुन्हा मोठं खिंडार; प्रवक्ते राजू वाघमारेंचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

काँग्रेसमधून एकामागे एक नेते बाहेर पडत आहेत. मुंबईतील बडे राजकीय व्यक्तीमत्व मिलिंद देवरा यांनी काही दिवसांपूर्वी पक्ष सोडला. त्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाला रामराम केला. मग बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेसची साथ सोडली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला पुन्हा एक धक्का बसला आहे. आता पक्षाची भूमिका माध्यमांकडे मांडणाऱ्या व्यक्तीनेच हा धक्का दिला आहे. काँग्रेस पक्षाची धडधडणारी तोफ शिवसेनेत गेली आहे. काँग्रेस पक्षाचे प्रवक्त राजू वाघमारे यांनी काँग्रेस पक्षाची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

राजू वाघमारे म्हणाले की, काँग्रेस पक्षाची सध्या होत असलेली फरफट आणि पक्षातील काही नेत्यांच्या गलिच्छ राजकारणाला कंटाळून मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस काम करते का? असा प्रश्न आहे. संजय निरुपम यांनी उत्तर पश्चिमची सीट मागितली. मात्र, त्यांच्यावर दबाव आणत पक्षाबाहेर काढलं. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना रक्त सांडत सांगावं लागतंय की सीट आमची आहे. भिंवडीची सीट थेट शरद पवारांनी जाहीर केली. याचा परिणाम माझ्या सारख्या कार्यकर्त्यांवर झाला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांना भविष्य कळत नाही काय आहे? त्यांना दिशा दाखवण्यासाठी आज मी पक्षप्रवेश करतोय.

मागील दोन वर्षांत मुख्यमंत्र्यांनी मोठी कामगिरी केली आहे. ते कॉमन मॅन सीएम आहेत. भारताच्या इतिहासात सर्वात जास्त काम करणाऱ्यात मुख्यमंत्र्यांचं नाव आहे. काँग्रेसमध्ये असताना शिंदे यांच्यासंदर्भात सर्व्हे असताना मी जाहीरपणे मान्य केलं होतं. ज्या मुख्यमंत्र्यांना सामान्य माणूस कधीही भेटू शकतो. जो 20-20 तास काम करतो, असा मुख्यमंत्री आवडणारा असणार असं मी चॅनलवर सांगितलं होतं. तेव्हा माझ्यावर टीका झाली, मात्र जे खरं आहे तेच मी बोलतो., असं राजू वाघमारे म्हणाले.

सांगलीची जागा काँग्रेसची आहे. परंतु उद्धव ठाकरेंनी ती जागा जाहीर केली. आता काँग्रेस नेत्यांना दिल्लीवाऱ्या कराव्या लागत आहेत. भिवंडीची जागा पारंपारिक काँग्रेसची होती तरीही शरद पवार गटाने त्यांच्या उमेदवाराची घोषणा केली.त्यामुळे काँग्रेस पक्षाची अवस्था बिकट झाली आहे. कुणाचा कुणाचा पत्ता नाही. म्हणूनच आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. असं राजू वाघमारे म्हणाले.