आज मुंबईत महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. कित्येक दिवसांपासूनचा महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. तर, सांगली आणि भिवंडीच्या जागांचाही तिढा सुटला आहे. त्यांनतर मात्र . त्यानंतर काँग्रेसच्या सांगलीतील स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी पसरल्याचं पाहायला मिळत आहे.
महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत याची घोषणा झाल्यानंतर काँग्रेस आमदार विश्वजीत कदम आणि विशाल पाटील हे नॉटरिचेबल झाले आहेत. सहाजिकच सांगलीची जागा हातून गेल्यानंतर ते नाराज असल्याची शक्यता नाकारता येत नाही.काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या सांगली लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसचे स्थानिक नेते आग्रही होते. येथून माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे निवडणूक लढवण्याची तयारी करत होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना पक्षात प्रवेश देत सांगली लोकसभा मतदारसंघातून त्यांची उमेदवारी जाहीर करून टाकली होती. त्यामुळे येथून लढण्यास इच्छूक असलेले काँग्रेसचे नेते विशाल पाटील आणि इतर कार्यकर्ते नाराज झाले होते. तसेच विश्वजित कदम यांनीही सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा यासाठी आग्रही भूमिका घेतली होती.
सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचं वर्चस्व आहे. मात्र महाविकास आघाडीत ही जागा शिवसेनेकडे गेली. शिवसेना ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र त्यानंतरही काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. विश्वजीत कदम यांनी आक्रमक भूमिका घेतली, विशाल पाटील यांच्यासोबतच इतर काँग्रेस नेत्यांसोबत विश्वजीत कदम दिल्लीला गेले. तिथे त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांनी चर्चा केली.
सांगलीच्या जागेवरून आक्रमक भूमिका घेतल्यास त्याचा परिणाम केवळ राज्यातच नव्हे देशपातळीवरही होऊ शकतो, अशी भीती काँग्रेस श्रेष्ठींना आहे. मित्रपक्षांना सोबत घेऊन जाण्यात काँग्रेस कमी पडतेय, हे चित्र निर्माण होणे हे काँग्रेससाठी फायद्याचे नाही. त्यामुळेच मैत्रीपूर्ण लढतीसाठीही काँग्रेस श्रेष्ठी अनुकूल नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
