रिझर्व्ह बँके ऑफ इंडियाने ( आरबीआय) महाराष्ट्रातील एका बँकेवर मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ महाराष्ट्रवर कारवाई केलीय. बँकेची आर्थिक स्थिती पाहता ही कारवाई करण्यात आलीय. त्यामुळं आता शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेतून पैसे काढण्यासह अनेक सेवावर बंदी आली आहे. तसेच ही बँक आता कोणतीही नवीन कर्ज देऊ शकणार नाही किंवा गुंतवणूक करता येणार नाही.
शिरपूर मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता रिझर्व्ह बँकेने हे पाऊल उचलले आहे. यामध्ये, सर्व बचत बँक किंवा चालू खाती किंवा ठेवीदाराच्या इतर कोणत्याही खात्यातील एकूण शिल्लकमधून कोणतीही रक्कम काढण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. तथापि, बँक ग्राहक रिझर्व्ह बँकेच्या या अटी व शर्तींनुसार त्यांच्या खात्यात जमा केलेल्या रकमेतून कर्जाची परतफेड करू शकतील.
आरबीआयने म्हटले आहे की पात्र ठेवीदारांना ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन कडून 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेव विमा दाव्याची रक्कम मिळण्यास पात्र आहेत. 8 एप्रिल 2024 रोजी व्यवसाय बंद झाल्यापासून शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेवर लादलेले निर्बंध सहा महिने लागू राहतील.मात्र, या सूचनांचा अर्थ बँकेचा परवाना रद्द करण्यात येऊ नये, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत बँक या अंकुशांसह बँकिंग व्यवसाय सुरू ठेवेल असे त्यात म्हटले आहे.
