उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाने स्वत:मध्ये बदल करण्याची गरज आहे, असं म्हणत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीकास्त्र डागलं आहे. महाविकास आघाडीचा विषय आता संपला, प्रचाराला सुरुवात झाली आहे, असं म्हणत प्रकाश आंबेडरकांनी महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.या निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणातल्या बऱ्याच गोष्टींमध्ये बदल होतील, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाने स्वत:मध्ये बदल करण्याची गरज आहे. स्वतःमध्ये बदल केले नाही तर, त्यांची इतर राजकीय संघटना आणि पक्षांसारखीच वाताहत होणार आहे. लोकशाही आणि उमेदवारीचं सामाजिकीकरण होणं आवश्यक असल्यामुळेच वेगवेगळ्या समाज घटकातल्या लोकांना लोकसभेचे तिकीट दिलं आहे. यामुळे जातीवादी राजकारणाला चाप बसू शकेल. या निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणातल्या बऱ्याच गोष्टींमध्ये बदल होतील, अशी शक्यताही आंबेडकरांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर एकमत न झाल्याने वंचितने प्रस्ताव फेटाळला. वंचित आणि महाविकास आघाडीचा मार्ग पूर्णपणे वेगळा झाल्याचे प्रकाश आंबेडकरांनी आता जाहीर केले आहे. आता प्रचाराला सुरुवात झाल्याने महाविकास आघाडीचा विषय संपला, असे आंबेडकर म्हणाले.
अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणारे वंचित बहुजन आघाडीने अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना प्रेशर कुकर हे चिन्ह मिळालं आहे. अकोल्यात वंचित, भाजप आणि काँग्रेस अशी तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांची लढत ही भाजपचे अनुप धोत्रे आणि काँग्रेसचे अभय पाटील यांच्याशी होणार आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीची साथ सोडली. त्यापूर्वी त्यांनी काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा दिला. तर शरद पवार गटाला बारामतीत पाठिंबा दिला आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात महाविकास आघाडी अकोल्यातून उमेदवार देणार नाही अशी चर्चा होती. परंतु काँग्रेसने अकोल्यातून उमेदवार दिला. त्यानंतर शरद पवार यांनी अजून वेळ गेलेली नाही. त्याबाबत चर्चा होईल, असं सूचक विधान केलं होतं. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना अकोल्यात पाठिंबा देण्यासाठी शरद पवार काँग्रेसचं मन वळवतील असं सांगितलं जात होतं. पण आज झालेल्या जागा वाटपात काँग्रेसने अकोल्यात आपला उमेदवार कायम ठेवला आहे. त्यामुळे अकोल्यात महाविकास आघाडी आंबेडकरांना टक्कर देणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
