छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफेमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या बॉम्बस्फोटातील दोन मुख्य संशयीत आरोपींच्या संपर्कात शहरातील तीन तरुण असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या बातमीनं खळबळ उडाली आहे. एनआयएकडून छत्रपती संभाजीनगरातील त्या तीन तरुणांची चौकशी करण्यात आली आहे. बंगळुरू स्फोटातील दोन मुख्य आरोपींसोबत क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून हे तरुण संपर्कात असल्याचा संशय एनआयएला आहे.
रामेश्वरम कॅफे बॉम्ब स्फोट प्रकरणात सुरुवातीला ‘पॅाप्युलर फ्रंट ॲाफ इंडिया’शी (पीएफआय) संबंधित एकाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर एनआयएने याप्रकरणी काही दिवसांपूर्वी साई प्रसाद नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले होते. हा व्यक्ती भारतीय जनता पक्षाच्या नेता असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला होता.
या प्रकरणाच्या अधिक चौकशीत एनआयएला छत्रपती संभाजीनगरच्या तिघांची नावे समोर आली. त्यावरून एनआयएच्या पथकाने शहर गाठले. दहशतवादविरोधी पथकाच्या मदतीने त्यांनी मयूर पार्कमधील बंगळूर स्फोट प्रकरणाचे धागेदोरे संभाजीनगरात तीन तरुणांची चौकशी केली. एनआयए आणि एटीएसच्या अधिकाऱ्यांनी मयूर पार्क परिसरातील तरुणांची त्यांच्या परिसरातच प्राथमिक चौकशी केली.
जवळपास ८ तासाच्या चौकशीनंतर या तरुणांना नोटीस बजावून पथक रवाना झाले. १ मार्च रोजी बंगळुरूमधील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट होऊन ११ जण गंभीर जखमी झाले होते. आयडी टायमर वापरून हा बॉम्बस्फोट करण्यात आला होता.
