राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा देताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

नसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मंगळवारी (ता.9) गुढीपाडवा मेळाव्यात लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले. तर या लोकसभा निवडणुकीत देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. तसेच मनसैनिकांना विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. राज ठाकरेंच्या या भूमिकेचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वागत केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून राज ठाकरे यांच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. सस्नेह स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्त्वावर विश्वास ठेवत, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी, भक्कम महाराष्ट्राच्या उभारणीसाठी, भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी मनसेचे प्रमुख राज ठाकरे जी यांचा अत्यंत आभारी आहे. आपण सारे मिळून निश्चितच जनतेच्या आशाआकांक्षांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण ताकदीनिशी संकल्पबद्ध होऊ या, असं ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ज्या प्रकारची टीका नरेंद्र मोदींवर आणि भाजपावर करत आहेत, तशी माझी टीका नव्हती. मला काही नको होतं. मला मुख्यमंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी विरोध केला नाही. मला भूमिका पटली नाही म्हणून मी विरोध केला. आज हे विरोधात बोलत आहेत. जेव्हा मी बोलत होतो तेव्हा खिशातले राजीनामे काढून माझ्याबरोबर का आला नाहीत? त्यावेळी सत्तेतून मिळणारा मलिदा चाटत बसले होते ना? आज यांना या गोष्टी सुचत आहेत. याचं कारण तुमचा पक्ष फुटला म्हणून आणि तुम्हाला सत्तेतून हाकलवलं म्हणून. तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही या गोष्टी केल्या. मी भूमिका पटली नाही म्हणून विरोध केला. मला त्याच्या बदल्यात काही हवं होतं म्हणून विरोध केला नाहीअसं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर आणि राऊतांवर टीका केली.

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनीही राज ठाकरे यांच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. हिंदुत्वासाठी आणि विकसित भारतासाठी “मोदींच्या परिवाराला” बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांचे आभार. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमाणे विचारांची तडफदार भूमिका आज महाराष्ट्राने पाहिली. सकाळी ऐकले ते “नकली” आणि संध्याकाळी महाराष्ट्राने पाहिले ते “असली”, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.