राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामती येथील पदाधिकारी मेळाव्यात बोलताना महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासह त्यांच्या प्रचारात सहभागी असलेल्या पवार कुटुंबातील सदस्यांवर घणाघाती टीका केली आहे. अजित पवारांचे सख्ख्ये बंधू श्रीनिवास पवार हेदेखील सुळे यांच्या प्रचारात असून काही दिवसांपूर्वी त्यांनी अजित पवारांवर टोकदार शब्दांत निशाणा साधला होता. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आजच्या आपल्या भाषणात कुटुंबातील सदस्यांना आक्रमक इशारा दिला आहे.
बारामतीत सूनेत्रा पवारांच्या विरोधात, अजित पवारांचे भाऊ सुद्धा प्रचार करत आहेत. त्यावरुन अजित पवार आता चांगलेच भडकले आहेत. माझ्या निवडणुकीत न फिरलेली भावंडं आता गरागरा फिरत आहेत. मी तोंड उघडलं तर फिरता येणार नाही, असा इशाराच अजित पवारांनी दिलाय. आपलेच सख्खे भाऊ श्रीनिवास पवारांचा अजित पवारांनी जळजळीत समाचार घेतलाय. माझ्या निवडणुकीत न फिरलेली भावडं आता गरागरा फिरत आहेत.
शरद पवार सध्या बारामती मतदारसंघात दौरे करीत आहेत. ‘बारामतीकरांना माहिती आहे, की अर्ज भरल्यानंतर बारामतीत त्यांची शेवटी सभा व्हायची. आता का फिरावे लागतेय? का ही वेळ आली. आम्ही सांगत होतो ना. आम्ही करतोय. मी राज्य चालवू शकत नाही का? प्रशासनावर माझी पकड नाही का? अधिकारी माझे ऐकत नाहीत का? प्रशासनावर माझी पकड आहे हे कोणीही नाकारू शकत नाही, असे अजित पवार म्हणाले.
मी पक्ष चोरला नाही. एखादं काम पुढच्या पिढीनं हातात घेतलं, तर ती चोरी कशी ?” असा सवाल अजित पवार यांनी केला. “पक्ष चोरला म्हणता मग माझ्याबरोबर 80 टक्के लोक कसे आले? त्यांनीही आपापल्या भागात पक्ष वाढवला होता ना. त्यांना भूमिका पटली म्हणूनच ते माझ्यासोबत आले. आमच्या वरिष्ठांनी सातत्यानं भूमिका बदलली. 2014 ला भाजपाला पाठींबा देवून टाकला. पुन्हा म्हणाले, नाही देणार. 2019 ला पाठींबा देतो म्हणाले, दिला नाही. म्हणजे तुम्ही करता ते सगळे बरोबर, अन् आम्ही केलं की चुकीचं, हे कसं ? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नामोल्लेख टाळून शरद पवार यांना केल्याचे दिसून आले.
