लोकसभा निवडणुकीचा पहिल्या टप्पा १९ एप्रिल रोजी पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते’, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. आता प्रफुल्ल पटेल यांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
प्रफुल्ल पटेल यांनी मोठा दावा केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. ‘लोकसभा निवडणुकीदरम्यान या गोष्टीवर काही भाष्य करू इच्छित नाही. पण एवढं बोलतो की, प्रफुल्ल पटेल हे काही खोटे बोलत नाहीत,आधीदेखील या विषयासंदर्भात मी बोललो आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुजोरा दिला आहे.
प्रफुल्ल पटेल म्हणाले, पवार साहेब हेच माझे नेते आहेत आणि वैयक्तिकरित्या माझे त्यांच्याशी खूप जवळचे संबंध आहेत. शरद पवार साहेब निर्णयाच्या शेवटच्या क्षणी संकोचतात. यावेळी पटेल यांनी देवेगौडा सरकार काळातील एका प्रसंगाची आठवण सांगितली.
“१९९६ मध्ये देवेगौडा सरकारमध्ये असताना आणि सीताराम केसरी काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी १० महिन्यांच्या आत सरकारमधून आपला पाठिंबा काढून घेतला. त्यावेळी देवेगौडा यांनीच मला पवार साहेबांना काँग्रेसचे नेतृत्व करण्यास सांगा, मी राजीनामा देऊन त्यांना पाठिंबा देईन असे सांगितले होते. त्यावेळी काँग्रेस पक्षातील सर्व नेते सीताराम केसरी यांच्यावर नाराज होते आणि त्यावेळी शरद पवार यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली असती तर कदाचित पवार साहेब पंतप्रधान झाले असते,असंही पटेल म्हणाले.
